कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयासह दहा प्रभागांमधील नागरी सुविधांमधील पाणी देयक, मालमत्ता कर आणि इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या संकेतस्थळामध्ये (ॲप्लिकेशन) मागील चार दिवसांपासून तांत्रिक अडथळे आले आहेत. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांमध्ये आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना कामकाज ठप्प असल्याने परत जावे लागत आहे.

मागील गुरूवार, शुक्रवारपासून नागरी सुविधा केंद्रांमध्ये पाणी, मालमत्ता कर देयक भरण्याच्या अडचणी सुरू झाल्या होत्या. दोन दिवसाच्या अवधीत ऑनलाईन माध्यमातील तांत्रिक अडथळे दूर होऊन सोमवारपर्यंत संकेतस्थळ सुस्थितीत होईल असे कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सांगण्यात येत होते.

सोमवारी नेहमीप्रमाणे नागरिक पालिकेच्या प्रभागांमधील नागरी सुविधांमध्ये मालमत्ता कर, पाणी देयक आणि इतर कामे घेऊन आले. त्यावेळी त्यांना कर्मचाऱ्यांकडून यंत्रणा अद्याप ठप्प असल्याचे उत्तर देण्यात आले. देयक भरण्याची यंत्रणा चार दिवस ठप्प असुनही पालिकेकडून त्यावर प्रभावी कारवाई किंवा नियंत्रक यंत्रणेकडून हे काम तातडीने सुस्थितीत करून का घेतले जात नाही, असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मंगळवारी सकाळी नागरिक नागरी सुविधा केंद्रात आले तेव्हा त्यांना यंत्रणा ठप्प असल्याचे सांगण्यात आले.

पाणी देयक, मालमत्ता कर भरण्याची मुदती संपल्या आहेत. त्यात पालिकेचे देयक भरणा करून घेणारे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे दंडात्मक रक्कम भरणा करून नागरिकांना आपली देयक, कर भरण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तांत्रिक कारणामुळे देयक भरणा उशिरा केला तरी तो उशिराचा दंड नागरिकांना पडणार आहे.

दररोज सकाळपासून ते संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपेपर्यंत नागरिक दहा प्रभागांच्या माध्यमातून पाणी देयक, मालमत्ता कराच्या माध्यमातून लाखो रूपयांचा भरणा करतात. ही रक्कम भरणा करून घेणारी संकेतस्थळ यंत्रणा बंद असल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांसह पालिका अधिकारी हतबल असल्याचे चित्र आहे.

पालिकेतील एका तांत्रिक क्षेत्रातील अधिकाऱ्याने सांगितले, ऑनलाईन सुविधा देणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या संकेतस्थळामध्ये (ॲप्लिकेशन) काही तांत्रिक अडथळे मागील चार दिवसांपासून आले आहेत. यामध्ये पालिकेच्या हातात काही नाही. सर्व्हर डाऊनचा याविषयाशी काही संबंध नाही. ठेकेदार कंंपनी आपले संकेतस्थळ सुस्थितीत गतिमान करील त्यावेळी ही यंत्रणा व्यस्थित होईल. याविषयी पालिकेने संबंधित ठेकेदार नियंत्रक कंपनीला कळविले आहे. पण या नियंत्रकांचा हा सर्वदूर प्रश्न निर्माण झाला आहे, असे समजते.

गेल्या चार दिवसांपासून पालिकेत फेऱ्या मारूनही मालमत्ता कर, पाणी देयक भरणा करून घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रभागांमधील नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अधिक माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर, सिस्टिम ॲनालिस्ट प्रवीण कांबळे यांना संपर्क साधला. त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही.