कल्याण : गणेशोत्सव पाच दिवसावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिकेच्या दहा प्रभागांमधील ठेकेदार खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याची कामे करत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्ते खड्डेभरणी करणाऱ्या ठेकेदारांची ऑनलाईन दृकदृश्यध्वनी चित्रण माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत येत्या दोन दिवसांच्या कालावधीत दिवस रात्र कामे करून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे करा, अन्यथा तुम्हाला काळ्या यादीत टाकल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

तसेच, आयुक्तांनी प्रत्येक प्रभागातील नियंत्रक अभियंत्यांनाही आपणही ही कामे विहित वेळेत ठेकेदारांकडून पूर्ण करून घेण्यासाठी ठेकेदारांकडे पाठपुरावा करा. आपल्याही कामात कुठे हलगर्जीपणा, निष्काळजीपणा दिसला तर आपणावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी आयुक्त गोयल यांनी नियंत्रक पालिका अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांना दिली.

कल्याण डोंबिवली शहरातील सीमेंट काँक्रीट रस्ते सोडले तर सर्व डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. या रस्त्यांवरून चालणे नाहीच पण वाहने चालविणेही अवघड झाले आहे. आता गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. तरीही ही खड्डे भरणीची कामे पालिका ठेकेदारांकडून करण्यात येत नसल्याने नागरिक, राजकीय नेत्यांचा संताप अनावर झाला आहे. कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, कल्याणचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत, मनोज वाघमारे, राहुल काटकर यांनी पालिकेला पत्र देऊन येत्या गणपतीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरणी करा, अन्यथा खड्ड्यांमध्ये बसून, खड्यांमध्ये अधिकाऱ्यांना जबरदस्तीने बसवून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

आयुक्त गोयल यांनी शुक्रवारच्या बैठकीत दहा प्रभाग हद्दीतील रस्ते खड्डे भरणी ठेकेदारांची मते जाणून घेतली. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्यासाठी अधिकची यंत्रणा आणा, वाढीव मनुष्यबळ वापरा आणि खड्डे भरणीची कामे दिवस, रात्र एक करून पूर्ण करा. दिवसा काम करण्यात अडथळे येत असतील तर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाल्यावर ही कामे पूर्ण करा, असा सल्ला दिला.

ही कामे येत्या दोन दिवसात पूर्ण झाली नाही तर मात्र आपणास काळ्या यादीत टाकले जाईल आणि अधिकाऱ्यांनी ही कामे पूर्ण करून घेतली नाहीत तर तुमच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा आयुक्त गोयल यांनी ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांना दिला. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत खड्डे भरणी, रस्ते डांबरीकरण, सीमेंट काँक्रीटचे रस्ते करणारे बहुतांशी ठेकेदार हे राजकीय आशीर्वादाने काम करत आहेत. आपल्या पाठीशी राजकीय नेता असल्याने हे ठेकेदार मनमानी पध्दतीने आणि संथगतीने काम करत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे मोठया बांधकाम कंपनीने घेतले आहे आणि नंतर तर ते काम कोणतीही यंत्रणा नसलेल्या राजकीय नेत्याच्या उपठेकेदाराला दिले आहे असे चित्र आहे.