कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागील तीस वर्षाच्या कार्यकाळात पालिकेत विविध कारणांनी नागरिकांकडे लाच मागणाऱ्या एकूण लाचखोरांची संख्या आता ४७ झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एकाच दिवशी घनकचरा आणि जलनिस्सारण विभागातील एकूण तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या सापळ्यात लाच घेताना सापडले. हे तिन्ही अधिकारी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी निलंबित केले.

महाराष्ट्रातील एकूण २७ महापालिकांमधील सर्वाधिक लाचखोर महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली पालिका ओळखली जाते. दरवर्षी एक ते दोन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडतात. तरीही पालिका कर्मचाऱ्यांची लाच स्वीकारण्याची हाव संपताना दिसत नाही. बांधकाम, लेखा अभियांत्रिकी, नगररचना, शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालकल्याण, समाज विकास हे पालिकेतील सर्वाधिक उलाढालीचे विभाग म्हणून ओळखले जातात.

गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी कल्याण डोंबिवली पालिकेचे साहाय्यक अभियंता रवींद्र भीवसन अहिरे (५७) एका पेट्रोलपंप चालकाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात ४० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या जाळ्यात सापडले. अहिरे बिर्ला महाविद्यालय समोरील रस्त्यावर लाच घेताना पकडले असतानाच, त्याच दिवशी घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, स्वच्छता निरीक्षक (सफाई कामगार) सुदर्शन जाधव हे एका सफाई कामगाराकडून २० हजार रूपयांची लाच घेताना पत्रीपुलाजवळील सर्वोदय माॅलमधील कार्यालयात रंगेहाथ सापडले.

एका सफाई कामगाराची तब्येत ठीक नसल्याने ते अनेक दिवस कामावर नव्हते. या कामगाराला हजर करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी देगलुरकर, जाधव सफाई कामगाराकडे ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करत होते. तडजोडीने ही रक्कम २० हजार रूपयांची करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनुपमा खरे यांनी देगलुरकर, जाधव यांना रंगेहाथ पकडले. अहिरे, देगलुरकर, जाधव हे तिन्ही अधिकारी ४८ तासाहून अधिक काळ पोलीस कोठडीत होते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले. क प्रभागातील एका पालिका कर्मचाऱ्याने मालमत्ता कर लावण्याच्या एका प्रकरणात एका महिलेकडे लाच म्हणून शरीर सुखाची मागणी केली होती. राज्यातील ही अशाप्रकारची लाच मागण्याचा प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेत घडला.

कल्याण डोंबिवली पालिकेतील पहिला लाचखोर अधिकारी म्हणून तुकाराम संख्ये यांना ओळखले जाते. ते १९९५ च्या दरम्यान अनधिकृत बांधकाम विभागात पर्यवक्षक होते. त्यांनी बेकायदा बांधकामाचे संरक्षण करण्यासाठी पंधराशे रूपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. ते लाचलुचपच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले होते.

लाच स्वीकारल्यानंतर गुन्हा दाखल होतो. वर्ष- दीड वर्षानंतर पुन्हा पालिका सेवेत दाखल होता येते. या लाचखोरीच्या प्रकरणात पालिकेतील एका कर्मचाऱ्याला कधीही न्यायालयातून शिक्षा होऊन तुरूंगाची हवा खाली लागली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लाचखोरीची हाव कायम आहे. पालिकेतील सर्वात मोठा लाचखोर म्हणून सुनील जोशी यांचे नाव सर्वदूर झाले होते. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा उल्लेख तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला होता.