कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचा एका साहाय्यक अभियंता रवींद्र भीवसन अहिरे (५७) गुरूवारी एका तक्रारदाराकडून ४० हजार रूपयांची लाच घेताना लाच घेताना बिर्ला महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. अभियंता अहिरे लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने मागील तीस वर्षात पालिकेतील एकूण लाचखोरांची संख्या ४५ झाली आहे. रवींद्र भीवसन अहिरे पालिकेच्या जलनिस्सारण, मलनिस्सारण विभागात कार्यरत आहेत. ते वर्गचे दोनचे अधिकारी आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्यात रवींद्र अहिरे यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने तक्रार केली. पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की याप्रकरणातील एक तक्रारदार यांना कल्याण शहरात श्री समर्थ पेट्रोलिंक्स पेट्रोलपंप सुरू करायचा होता. या कामासाठी तक्रारदार पेट्रोलपंप चालकाला पालिकेच्या जलनिस्सारण, मलनिस्सारण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी साहाय्यक अभियंता अहिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे गेल्या आठवड्यात ६० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात अडथळा आणला होता.
तक्रारदार पेट्रोलपंप चालकाने ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत रवींद्र अहिरे तडजोडीने ४० हजार रूपयांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरूवारी दुपारी कल्याण मधील बिर्ला महाविद्यालय प्रवेशद्वारा समोरील बस थांब्याजवळ अहिरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रूपये स्वीकारण्याचे ठरविले. ठरल्या वेळेत तक्रारदार पेट्रोलपंप चालक बस थांब्याजवळ थांबून राहिला. परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी साध्या वेशात सापळा लावून होते. ठरल्या वेळेत रवींद्र अहिरे आपल्या वाहनातून बस थांब्याजवळ आले. त्यांनी पेट्रोलपंप चालकाकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना वाहनातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचखोरीच्या या प्रकरणामुळे कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. दरवर्षी पालिकेत दोन अधिकारी, कर्मचारी हे लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. पालिकेच्या क प्रभागातील एका कर्मचाऱ्याने मालमत्तेला कर लावण्याच्या प्रकरणात एका महिलेकडून लैंगिक सुखाची मागणी केली होती. या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.
मागील तीस वर्षात कल्याण डोंबिवली पालिकेत लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचखोर कर्मचारी तपास अधिकाऱ्याबरोबर संगनमत करून ही प्रकरणे खिळीखिळी करून टाकतात. न्यायालयात ही प्रकरणे कायद्याच्या कसोटीवर टिकत नाहीत. मागील वीस वर्षापूर्वी पालिकेतील एक वाद्गग्रस्त अभियंता लाचखोरीत सापडला होता. कोट्यवधीचा माया या अभियंत्याच्या घरात सापडली होती. हा अधिकारी नंतर सहीसलामत पालिकेतून सेवानिवृत्त झाला. लाच घेतली तरी तुरूंगवासाची शिक्षा होत नाही. सहा ते वर्षभरात पालिकेच्या सेवेत पुन्हा दाखल होता येते, असा गैरसमज पालिका कर्मचाऱ्यांचा असल्याने लाच घेण्याचे प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेत वाढत असल्याची माहिीत एका माहिती कार्यकर्त्याने दिली.