कल्याण – चार सदस्य प्रभागमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. अ, ब, क आणि ड प्रभाग रचनेप्रमाणे ही नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. चतुसिमा निश्चित नसल्याने पालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय मंडळींमध्ये गोंधळ उडाला आहे.

चार सदस्य प्रभाग पध्दतीची प्रभाग रचना जाहीर झाली नसताना ही आरक्षणे जाहीर केलीच कशी, असा प्रश्न मनसेचे नेते राजू पाटील यांनी समाज माध्यमांतून शासन आणि पालिका प्रशासनाला केला आहे. या आरक्षण गोंधळावरून ठाकरे सेनेचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे.

अ, ब, क आणि ड या अंकलिपीप्रमाणे ही आरक्षण सोडत पालिकेने राज्य निवडणूक आयोग, शासन निर्देशाप्रमाणे जाहीर केली आहे. मागील वीस वर्षाच्या कालावधीत राजकीय मंडळी, माजी नगरसेवक यांना एक प्रभाग सदस्य पध्दतीने निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. पण, आता पहिल्यांदाच आगामी पालिका निवडणूक चार सदस्य प्रभाग पध्दतीने होत आहे. चार सदस्यांची प्रभाग रचना सलग आहे. या चार सदस्य प्रभाग रचनेत कोठेही भोगोलिक सीमा निश्चिती नाही. त्यामुळे अ, ब, क आणि ड पध्दतीने प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी यामध्ये आपला प्रभाग कोणता असेल याविषयी इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांनी पालिका अधिकाऱ्यांना ही सोडत कोणाच्या सोयीप्रमाणे करण्यात आली आहे, असे प्रश्न करून भंडावून सोडले आहे. चार सदस्य प्रभाग पध्दतीत आपल्या प्रभागाची भौगोलिक रचना निश्चित करून आपण प्रचार कसा करायचा, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे. या अ, ब, क आणि ड प्रभाग रचनेवर अनेक नागरिक, राजकीय मंडळींनी हरकती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती सूचनांसाठी पालिकेने नागरिकांना अवधी दिला आहे.

यापूर्वी शहरातील विशिष्ट भागाचा उल्लेख करून प्रभाग रचना जाहीर केली जात होती. यामध्ये अनुक्रमांकाबरोबर गणेश मंदिर, पेंडेसनगर, वालधुनी, रामबाग अशी नावे प्रभागांना दिली जात होती. ही रचनाच नव्याने प्रभाग पध्दतीत नाही. त्यामुळे आपला प्रभाग कोणता, त्याची भौगोलिक हद्द कोणती असे प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. या प्रभाग रचनेविषयी पालिकेत इच्छुक उमेदवार, नागरिकांनी अधिक संख्येने हरकती सूचना दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग पध्दतीत अ, ब, क आणि ड प्रभाग आरक्षण पध्दतीत असले तरी हे प्रभाग जुन्या रचनेप्रमाणेच आणि त्या भौगोलिक सीमारेषेप्रमाणे असणार आहेत. यामध्ये गोंधळ अजिबात नाही. निवडणूक आयोग, शासन निर्देशाप्रमाणे ही आरक्षण पध्दत आणि प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. – समीर भूमकर, उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका.