कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील डांबरी रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला तरी पालिकेकडून खड्डे भरणी करण्यात येत नाही. येत्या दोन दिवसाच्या कालावधीत हे खड्डे पालिकेने सुस्थितीत केले नाहीतर या खड्ड्यांमध्ये अधिकाऱ्यांचे विसर्जन करू, असा इशारा कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांची वाताहत झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे तरी एक रस्ता पालिकेकडून खड्डे मुक्त केला जात नाही. ज्या लोकप्रतिनिधींची रस्ते सुस्थितीत करून घेण्याची जबाबदारी आहे. ते आपल्याच कामांमध्ये मग्न आहेत. शहरातील ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे शक्य होत नाही. रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी अंगावर उडून पादचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार वाढत चालले आहेत. खड्ड्यांमुळे ही भयानक स्थिती निर्माण झाली असताना पालिका प्रशासन याविषयी पूर्णता उदासीन दिसत आहे. येत्या दोन दिवसाच्या कालावधीत पालिकेने खड्डे भरणी पूर्ण केली नाहीतर मनसे पध्दतीने जागोजागी रस्त्यांवर आंदोलन केली जातील, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले, गेल्या दोन महिन्यापासून आपण पालिकेकडे पत्रव्यवहार करून कल्याण पूर्वेतील नेतिवली, तिसगाव, लोकग्राम ते तिसगाव नेतिवली रस्ता, चिंचपाडा, नांदिवली तर्फ, द्वारली, भाल, मलंगगड रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी पालिकेकडे करत आहोत. पण वरवरची मलमपट्टी करण्या व्यतिरिक्त पालिकेकडून कोणतीही ठोस कृती केली जात आहे. या खड्ड्यांमुळे गणपती आणताना काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. या खड्ड्यांमुळे मखरात गणपती कसे आणायचे असे प्रश्न पडले आहेत. ही सर्व बाहेर भयावह स्थिती असताना अधिकारी फक्त पालिका दालनात बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे. हे जबाबदार अधिकाऱ्यांना अजिबात भूषणावह नाही. येत्या दोन दिवसात प्रशासनाने खड्डे भरणीची कामे पूर्ण केली नाहीत तर मात्र या खड्ड्यांमध्येच गणपती बरोबर अधिकाऱ्यांचे विसर्जन करू, असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.
यापूर्वी गणेशोत्सवापूर्वी मुसळधार पाऊस असला तरी अभियंते रात्री आठ ते पहाटे पर्यंत रस्त्यावर उभे राहून खड्डे भरणीची कामे करून घेत होते. आता गणेशोत्सव तोंडावर आला तरी खड्डे भरणी विषयी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे, असे महेश गायकवाड यांनी सांगितले. या खड्डयांमुळे शिळफाटा रस्त्यावर गेल्या महिन्यात कल्याण मधील एका तरूणाला जीव गमवावा लागला. त्या तरूणाला भरपाई मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी गायकवाड यांनी केली.या खड्ड्यांमुळे कल्याण, डोंबिवली शहरे, मेट्रो कामांमुळे शिळफाटा रस्ता दररोज सकाळपासून कोंडीत अडकत असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.