कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेत मागील पाच वर्षापासून लोकप्रतिनिधी राजवट नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. महासभा, स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय अधिकारी मनमानी पध्दतीने पालिका तिजोरीची कशी उधळपट्टी करतात याचा एक नवीन प्रकार उघडकीला आला आहे.

तत्कालीन आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या कार्यकाळात कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील ‘कर्मयोग’ नावाच्या आयुक्त निवासस्थान, बंगल्यातील फर्निचर, देखभाल आणि बगिच्या फुलविण्यासाठी अर्थसंकल्पातील जनतेच्या पैशातून ५० लाख रूपयांची उधळपट्टी केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

या खर्चामध्ये आयुक्त बंगला भागातील बगिचा फुलविण्यासाठी आठ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. आयुक्त जाखड यांच्या काळात बांधकाम विभागाने अधिक खर्चाची कामे केली असल्याची चर्चा सुरू होती. त्याची माहिती बाहेर येऊन देण्यात येत नव्हती. आयुक्त जाखड यांची बदली झाल्यानंतर ही माहिती आता उघडकीला आली आहे. या संपूर्ण खर्च प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शहर अभियंत्यासह विद्यमान शहर अभियंता अनिता परदेशी यांची चौकशी आणि निलंबित करण्याची मागणी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.

आयुक्त बंगल्यात एवढी कोणती तातडीची गरज होती की त्यासाठी ५ (२) (२) या अत्यावश्यक खर्चातून अर्थसंकल्पातील तरतुदीतून ५० लाख रूपये खर्च करण्यात आले. या अत्यावश्यक खर्चास मंजुरी द्यावी, असे नमूद असताना अगोदरच हा खर्च प्रशासनाने केला कसा. आयुक्त बंगला हा घर खर्चाचा विषय आहे. निविदा प्रक्रिया न राबविता ही कामे देण्यात आली आहेत. या एकूण खर्चात मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार कुलकर्णी यांनी केली आहे.

आयुक्त निवासस्थान कामे

आयुक्त बंगल्यातील फर्निचर, प्रसाधनगृह दुरुस्ती, छतावर पाणी प्रतिबंधित यंत्रणा बसविणे या कामासाठी १५ लाख ४८ हजार रूपये, बगिचात लाल माती, शोभिवंत झाडे, नवीन उपकरणे बसविणे कामासाठी आठ लाख ५० हजार रूपये, निवासस्थान देखभाल दुरुस्तीवर १७ लाख रूपये, संरक्षक भिंत काम नऊ लाख ७९ हजार रूपये, बंंगला रंगकाम खर्चावर २४ लाख ९२ हजार रूपये, छताची दुरुस्ती १४ लाख ८४ हजार रूपये, छतावर उष्णता परावर्तित पट्ट्या बसविणे सात लाख ५१ हजार रूपये. अशी निधीची विगतवारी आहे, असे तक्रारदार कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

जय मल्हार उद्योग, गोल्डन कन्स्ट्र्क्शन, सुमित विलास बागड, देवा एन्टरप्रायझेस, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांनी ही काम केली आहेत. अधिक माहितीसाठी शहर अभियंता अनिता परदेशी यांना संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

इमारत देखभाल दुरुस्ती खर्चातून आयुक्त बंगल्यावर खर्च करण्यात आला आहे. बंगल्याची नियमित आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे देखभाल केली जाते. यात नवीन काही नाही. काही मंडळी तक्रार करून विषयाला फाटा फोडतात, असे नाव न छापण्याच्या अटीवर बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.