कल्याण : शासन सेवेत असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने शासन निधीतील रकमेचा गैरमार्गाने आर्थिक लाभ घेऊ नये, अशी महाराष्ट्र नागरी सेवा आणि वर्तणूक नियमात तरतूद आहे. असे असताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील एका मुख्य औषध मिश्रकाच्या (हेड फार्मासिस्ट) डोंबिवली पूर्व देसलेपाडा येथील एका इमारतीमधील गाळ्यामध्ये पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने हिंंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (आरोग्यवर्धिनी केंद्र) सुरू केला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात मुख्यालयात अनिल शिरपूरकर यांची नियुक्ती आहे. ते मुख्य औषध मिश्रक (हेड फार्मासिस्ट) आहेत. शिरपूरकर पालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी आहेत. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज गृहसंकुलात शिरपूरकर यांचा गाळा आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांना आपल्या भागातच पालिकेची रूग्णसेवा मिळाली पाहिजे म्हणून आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचे तीन ते चार वर्षापूर्वी शासनाने निर्देश दिले आहेत.

त्यामुळे पालिकेने शहराच्या विविध भागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रे सुरू केली आहेत. एकूण ७४ केंद्र शहराच्या अनेक भागात प्रस्तावित आहेत. हे दवाखाने सुरू करण्यासाठी जागेचे क्षेत्रफळ ५०० चौरस मीटर लागते. प्राप्त जागेप्रमाणे हे केंद्र त्या भागात पालिकेकडून सुरू केले जाते.

देसलेपाडा भागात पालिका आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा शोधत होती. मिळणारी जागा कमी क्षेत्रफळाची होती. या भागात लोढा हेरिटेज इमारतीमधील दोन गाळे योग्य क्षेत्रफळाचे असल्याने पालिकेने त्या गाळ्यांना पसंती दिली. तेथे वैद्यकीय आरोग्य विभागाने आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले. गाळेधारकाला पालिकेकडून दरमहा सुमारे एक लाख रूपयांचे भाडे दिले जाते.

पालिकेच्या दप्तरी देसलेपाडा आरोग्य केंद्र गाळ्यांच्या नावापुढे पालिका कर्मचारी अनिल शिरपूरकर आणि एका धारक यांची गाळेधारक म्हणून नावे आहेत. पालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या भाड्याचे अनिल शिरपूरकर हेही लाभार्थी आहेत. शिरपूरकर हे पालिकेचे कर्मचारी असताना ते भाड्याचा लाभ कसा घेतात. त्यांनी आपला गाळा भाड्याने पालिकेला दिला कसा, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

पालिका वैद्यकीय आरोग्य विभागातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी मिळवून संगनमताने आपल्याच विभागातील कर्मचाऱ्याची जागा भाड्याने घेतल्याची पालिकेत चर्चा आहे. यामधील एका डाॅक्टरची पालिका मुख्यालयातून बदली झाली आहे. तर एक जण मुख्यालयात ठाण मांडून आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवलीत नोकरी करून बाहेर कंपन्यांचे संचालक राहून आर्थिक लाभ कमविणारा साहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी पालिकेने सेवेतून बडतर्फ केला. एका कार्यकारी अभियंत्याने निलंबन काळात इमारती उभारून आर्थिक लाभ मिळवला. हाही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचाऱ्याची कबुली

अनिल शिरपूरकर यांनी लोकसत्ताला सांगितले, देसलेपाडा येथील गाळ्यातील आपली जागा आपण आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी पालिकेला भाड्याने दिली आहे. यासंदर्भात पालिकेबरोबर करार केला आहे. पालिकेने पाहिलेली जागा ३०० चौरस फुटाची होती. त्यांना ५०० चौरस फुटाच्या जागेची गरज होती. त्यामुळे त्यांनी या जागेला पसंती दिली. नियमानुसार सर्व आहे.