कल्याण : डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, तसेच कल्याण शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी (ता. १९) सात तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. महावितरणकडून पालिकेच्या पाणी पुरवठा केंद्रांना करण्यात येणाऱ्या कल्याण मुरबाड रस्त्यावरील कांबा येथील वीज पुरवठा केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणला तातडीने करायची आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या उदंचन केंद्राला आणि १०० दशलक्ष लीटर मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा कल्याण मुरबाड रस्त्यावरील उल्हासनगर शहरा जवळील टाटा पाॅवरच्या कांबा उपकेंद्रातून केला जातो. टाटा पाॅवर कांबा उपकेंद्रातील एनआरसी-दोन या फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणला तातडीने करावयाचे आहे. या कामासाठी महावितरणकडून मंगळवारी पालिकेच्या मोहिली येथील उदंचन केंद्र आणि जलुशुध्दीकरण केंद्रांना होणारा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदसाठी महावितरणने पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. या कामासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. वीज पुरवठा केंद्रातील दुरुस्ती महत्वाची असल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी या बंदसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे महावितरणने मंगळवारचा बंद निश्चित केला आहे.

मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील उल्हास नदीतून उचललेले कच्चे पाणी कचोरे गाव हद्दीतील नेतिवली येथील टेकडीवर जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाते. तेथून हे पाणी डोंबिवली शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला पुरवठा केले जाते. मोहिली उदंचन केंद्र बंद राहणार असल्याने नेतिवली जलशुध्दीकरणात पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, मोहिली येथील १०० दशलक्ष लीटरच्या जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, धाकटे शहाड, ग्रामीणमधील इतर गावे, कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, गौरीपाडा, मुरबाड रस्ता परिसराला पाणी पुरवठा केला जातो. या भागाचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी सात तास बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी केले आहे.