कल्याण – महापारेषण कंपनीच्या पडघा येथील कल्याण, डोंबिवली शहरांना वीज पुरवठा करणाऱ्या पडघा-पाल (मानपाडा) २२० केव्ही ईएचव्ही मनोऱ्यावरील वीज वाहिकेत तांत्रिक बिघाड झाला आहे. हे बिघाड दुरूस्त करण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महावितरणने कल्याण, डोंंबिवली शहरांच्या विविध भागात विभागवार एक तासांचे अघोषित वीज भारनियमन सुरू केले आहे.
महापारेषण, महावितरणकडून ग्राहकांना यासंदर्भात कोणताही सविस्तर खुलासा करण्यात आला नसल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात चार दिवसापूर्वी महापारेषणच्या भिवंडी पडघा येथील पडघा-पाल (मानपाडा, डोंबिवली) २२० केव्ही ईएचव्ही मनोरा मार्गाने (टाॅवर लाईन) येणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीत काही तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे कल्याण, डोंंबिवली शहर परिसराचा वीज पुरवठा चार ते पाच तास खंडित झाला होता. मुसळधार पाऊस, वादळाची परिस्थिती नसताना वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
या अति उच्चदाब वीज वाहिनींवरील बिघाडानंतर पडघा-पाल वीज वाहिनींवरून ज्या कल्याण, डोंंबिवली शहर परिसरांना वीज पुरवठा होतो. त्या शहरांमध्ये गेल्या आठवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एक ते दोन तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. बँका, खासगी आस्थापनांमधील व्यवहार ठप्प होत असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. वीज पुरवठा खंडित झाला की इंटरनेट यंत्रणा बंद पडत आहे. या यंत्रणेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिक, नोकरदार वर्ग, आस्थापनांना खंडित वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.
पडघा येथून वीज पुरवठा खंडित आहे. मात्र नागरिकांना हे माहिती नसल्याने नागरिक स्थानिक महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून भंडावून सोडत आहेत. महावितरणच्या संपर्क क्रमांकावर नागरिक वीज पुरवठा खंडित झाला की सतत फोन करत असल्याने महावितरणचा संपर्क क्रमांक नागरिकांना एक एक तास व्यस्त येत असल्याचा अनुभव येत आहे.
विजेच्या या सततच्या लपंडावामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून कल्याण ग्रामीणचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी गुरूवारी महावितरणच्या डोंबिवलीतील कार्यकारी अभियंतांची भेट घेतली. कल्याण, डोंबिवली शहरांचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली. हा पुरवठा सुरळीत झाला नाहीतर जनआंदोलन करण्याची ताकीद दिली. वीज पुरवठा खंडित राहत असल्याने रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक, व्यापारी, खासगी आस्थापना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी पडघा पाल या वीज वाहिकेत गेल्या आठवड्यात मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता महावितरण अधिकाऱ्यांनी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे अद्याप पाच ते सहा दिवस नागरिकांना महावितरणचे वीज भारनियमन आणि विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.