कल्याण – कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवलीत ज्या पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठबळावर शिंदे शिवसेना, भाजपमधील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ते सर्व जोरकस कार्यकर्ते, पदाधिकारी आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे चित्र आहे. शिवसेना, भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा फटका आपणास आणि येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये आपणास बसू नये म्हणून सुरुवातीला बंडखोरांना पाठबळ देणारे भाजप, शिवसेनेतील कार्यकर्ते आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे समजते.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतून महेश गायकवाड दोन वर्षांपासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकारानंतर वातावरण बदलले. कल्याण पूर्व भागातून शिंदे शिवसेनेतून नीलेश शिंदे, विशाल पावशे, प्रशांत काळे यांची नावे विधानसभेसाठी चर्चेला होती. या गटाने लोकसभा अधिवेशन सुरू असतानाच्या काळात दिल्लीत जाऊन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन विधानसभेची व्यूहरचना आखली होती. यात शिंदे, पावशे उमेदवारीसाठी आघाडीवर होते.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

भाजपने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अचानक सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिंदे शिवसेनेतील महेश गायकवाड यांच्यासह निष्ठावान गट तीव्र नाराज झाला. या गटाने सुरूवातीला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून जोरदार फडफड केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे यांनी या नाराज निष्ठावान शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिल्यानंतर ते शांत झाले. ही नाराजाची ताकद आपणास मिळेल या आशेने महेश गायकवाड निवडणूक लढविण्याच्या विषयावर ठाम राहिले.

महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांना आव्हान देण्यासाठी आपला उमदेवारी अर्ज कायम ठेवला. शिवसेनेकडून झालेल्या हकालपट्टीच्या कारवाईला त्यासाठी ते सामोरे गेले. आता महेश गायकवाड कल्याण पूर्वेत जोरदार प्रचार करत आहेत. यासाठी स्थानिकांसह भिवंडी भागातून त्यांनी तगडी फौज कल्याण पूर्वेत प्रचारात उतरवली असल्याचे समजते. या प्रचारात सुरुवातीला महेश यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे निष्ठावान शिवसैनिक मात्र त्यांच्या प्रचारातून गायब असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी गणेशोत्सव काळात आगरी समाजातील माजी नगरसेवक, समाजाला संघटित करून भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत दीपेश यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर त्यांचा वाढदिवस इतर विषयांवरून व्यक्तिगत पातळीवर टीका केल्याने हा विषय चिघळला. दीपेश यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले. त्यांचे समर्थन करणाऱ्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाला तडीपाराची नोटीस बजावण्यात आली. या कारवायांमुळे दीपेश यांच्या पाठीशी असलेला आगरी समाजासह इतर नाराज गट त्यांची साथ सोडून पुन्हा मूळ स्थानी आला. आता दीपेश म्हात्रे प्रदेश काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या साथीने प्रचारात उतरले आहेत.

हेही वाचा – राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पश्चिमेत माजी खा. कपिल पाटील यांचे नातेवाईक वरूण पाटील निवडणूक लढवित आहेत. भाजपने त्यांची हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काम न केल्याच्या रागातून शिवसेनेला उपद्रव देण्यासाठी ही खेळी पाटील गटाकडून खेळण्यात आल्याचे समजते.