कल्याण : तुम्ही ऑनलाईन माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल. तसेच तुमच्या बँक खात्यात काही बोनसपात्र रक्कम जमा करायची आहे असे सांगून भामट्यांनी कल्याण, डोंबिवलीतील दोन घटनांमध्ये गेल्या आठवड्यात नऊ जणांची एकूण एक कोटी २६ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षभरापासून कल्याण परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत.

डोंबिवली जवळील पलावा वसाहतीत राहणाऱ्या तनुश्री अशोक जुग्रान या खासगी नोकरी करतात. त्यांचे ॲक्सिस बँकेत खाते आहे. गेल्या आठवड्यात त्यांना एका इसमाने संपर्क केला. आपण ॲक्सिस बँकेतून बोलतोय. आपल्या बँक खात्यावर काही बोनसपात्र रक्कम जमा करायची आहे. असे तक्रारदार तनुश्री यांना भामट्याने सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. ॲक्सिस बँकेतून फोन आल्याने तनुश्री यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. बोलण्याच्या ओघात भामट्याने तनुश्री यांच्याकडून गुप्त संकेतांक क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर भामट्याने तनुश्री यांच्या बँक खात्यात छेडछाड करून ॲक्सिस बँकेकडून तनुश्री यांच्या नावाने १० लाख ७२ हजार रूपयांचे कर्ज घेतले.

हेही वाचा…लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी

ही रक्कम तनुश्री यांना अंधारात ठेऊन परस्पर भामट्याने काढून घेतली. अशाच पध्दतीने भामट्याने इतर सात जणांची फसवणूक केली आहे. तनुश्री यांच्या अर्जावरून मानपाडा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा…ठाणे पालिकेच्या ५७ शाळा मुख्याध्यापकाविना, शिक्षक उलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

कल्याणमध्ये खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रौनक सिटीमध्ये राहणाऱ्या मनोजकुमार बिरेंद्रप्रसाद श्रीवास्तव (४६), मुस्कान आहुजा यांची आरोपी सुसान बिन्वी यांनी शेअर गुंतवणुकीच्या नावाने एकूण एक कोटी १५ लाखाची फसवणूक केली आहे. यामध्ये श्रीवास्तव यांची ९३ लाख, मुस्कान यांची २१ लाख रूपये रक्कम आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मुस्कान यांना एक गुंतवणूक व्हाॅट्स ग्रुप सामायिक करण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.