कल्याण – गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीने प्रवासी हैराण आहेत. या रस्त्यांच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात धुळीचे लोट शिरत असल्याने रहिवाशांना घराच्या खिडक्या बंद ठेऊन व्यवहार करावे लागत आहेत. या धुळीच्या त्रासामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांच्या त्रासाबरोबर रहिवाशांना धुळीच्या त्रास सुरू झाला आहे.

पाऊस सुरू असला की ही धूळ दबून राहते. पावसाने उघडिप दिल्याने ही धूळ पावडर रस्त्यावर पसरली आहे. पावसाचे दिवस सुरू असताना सकाळ, संध्याकाळ वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांवर धूळ उडत असल्याने नागरिक, त्याच बरोबर शालेय विद्यार्थी, पालक हैराण आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक रस्ते सीमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. उर्वरित डांबरीकरणाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. ही कामे काही ठिकाणी रखडलेल्या स्थितीत तर काही ठिकाणी पूर्ण थंडावली आहेत. या रस्ते कामाच्या ठिकाणी पालिकेला खड्डे बुजविण्याची कामे करता येत नाहीत. मुसळधार पाऊस सुरू असताना यापूर्वी ठेकेदाराने माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याची कामे केली.

सकाळी बुजवलेले हे खड्डे संध्याकाळपर्यंत सततच्या वाहन वर्दळीमुळे उखडले गेले. त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. हा खड्ड्यांचा त्रास सुरू असताना प्रवाशांना आता रस्त्यावरील धुळीचा त्रास सुरू झाला आहे. धुळीच्या त्रासाने सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत असल्याच्या तक्रारी खासगी डाॅक्टर करत आहेत. खासगी दवाखाने या रुग्णांनी भरून गेले आहेत. पाऊस सुरू असताना ठेकेदाराने माती आणि खडीचा वापर करून खड्डे भरणी केली. आता पावसाने दडी मारल्याने कोरडी झालेली धूळ वाहनांच्या वर्दळीने हवेत उडत आहे. बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. दुचाकी स्वार या खडीवर घसरून पडत आहेत. कल्याण, डोंबिवलीत डांबरीकरणाचे रस्ते असलेल्या भागात सर्वाधिक धूळ आणि खड्डे आहेत.

डोंबिवलीत पूर्वेत टिळक रस्ता, टिळक पुतळा ते चार रस्ता, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली चोळे गाव रस्ता, कल्याणमध्ये के. सी. गांधी शाळा ते शिवाजी चौक, काटेमानिवली, कोळसेवाडी, मानपाडा रस्ता, पत्रीपूल ते ९० फुटी रस्ता भागात सर्वाधिक धुळीचे लोट पसरत आहेत. पालिकेच्या ताफ्यात दोन धूळ शमन वाहने आहेत. ती बाहेर काढून नागरिकांना होणाऱ्या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.