कल्याण – दारूच्या आहारी गेलेल्या एका तरूणाने दारूसाठी पैसे पाहिजेत म्हणून एका रिक्षेची चोरी केली. वाटेतच रिक्षेतील इंधन संपल्याने या तरूणावर रिक्षा रस्त्यावर सोडून द्यावी लागली. या सगळ्या कथानाट्यात दारूच्या आहारी गेलेला हा तरूण अखेर कोळसेवाडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

प्रांजल मनोज बर्वे (२६, रा. कर्पेवाडी, न्यू जिम्मी बाग, कल्याण पूर्व) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो , शीत कपाट, वातानुकूलित यंत्र दुरुस्तीचे काम करतो. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कल्याण पूर्वेतील जिम्मी बाग भागात राहणारे राजेश मेहुलिया (४६) यांची रिक्षा रात्रीच्या वेळेत चोरीला गेली होती. सकाळी रिक्षा चालक रिक्षा बाहेर काढण्यासाठी आले त्यांना रिक्षा आढळून आली नाही. त्यांनी परिसरात रिक्षेचा शोध घेतला. ती रिक्षा चोरीला गेल्याचे त्यांना समजले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाने तक्रार केली होती.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, संदीप भालेराव यांच्या पथकाने तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या चोरीचा तपास करताना एक रिक्षा विठ्ठलवाडी बस आगाराच्या बाहेर बेवारस स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रिक्षा चालक मेहुलिया यांचीच ही रिक्षा असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांना रिक्षा सुस्थितीत असल्याचे आढळले. रिक्षेचा एकही भाग चोरीस गेला नव्हता. मग या रिक्षेची चोरट्याने चोरी का केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

पोलिसांनी चोरीचे ठिकाण ते विठ्ठलवाडी बस आगार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंमधील चित्रण तपासले. त्यामध्ये एक जण रिक्षा त्या ठिकाणी घेऊन येत असल्याचे आणि तेथून रिक्षा सोडून देऊन निघून जात असल्याचे दिसत होते. हवालदार रोहित बुधवंत यांनी रिक्षा चालक मेहुलिया यांच्या मदतीने त्या चोराची ओळख पटवली. सदर इसम हा रिक्षा चालक राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात राहत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केली. प्रांजल बर्वे असे त्याने नाव सांगितले. प्रांजल बर्वे याने सांगितले, दोन दिवसापूर्वी आपण दारू प्यायलो होतो. आपणास अद्याप दारू प्यायची तलफ आली होती. त्यासाठी आपण रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडलो. बाहेर एकही रिक्षा किंवा अन्य वाहन नव्हते. त्यामुळे घराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी एक रिक्षा उभी होती. आपण जाऊन ती रिक्षा सुरू केली आणि दारू आणण्यासाठी आपण रिक्षा घेऊन विठ्ठलवाडी बस आगाराच्या दिशेने निघालो. बस आगाराजवळ गेल्यावर रिक्षेतील सीएनजी गॅस संपला. प्रयत्न करूनही रिक्षा सुरू झाली नाही. त्यामुळे आपण रिक्षा तेथेच सोडून दिली. आणि दारूच्या ठिकाणी पायी जाणे शक्य नसल्याने तेथून घरी निघून आलो. दारूसाठी हे कृत्य केल्याने ते प्रांजलच्या अंंगलट आले. पोलिसांनी त्याला अटक केली.