कल्याण – कल्याण मधील मोहने येथे गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथे राहत असलेल्या एका ४० वर्षाच्या रहिवाशाचा गोरेगाव भागातच राहत असलेल्या एका तरूणाने मोहने येथील एका खासगी रुग्णालयाच्या पायरीजवळ डोके आपटून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. या खुनामागचे कारण समजू शकले नाही. आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक एम. एस. आंधळे यांनी दिली.
या गुन्ह्यात मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या मारिअप्पा राजू नायर (४०) यांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव येथे राहत असलेल्या गणेश रमेश पुजारी (२६) याने हा खून केला आहे. खडकपाडा पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक एम. एस. आंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले.
या खून प्रकरणी मोहने येथील गणपती रुग्णालयातील वाॅर्डबाॅय सागर दिलीप पगारे (२७) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या निर्घृण खून प्रकरणाने मोहने परिसरात खळबळ उडाली आहे. खुनातील सहभागी दोघेही मुंबईतील गोरेगाव येथील राहणार असल्याने त्यांचे येथे कशावरून भांडण झाले अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
सागर पगारे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेली माहिती, अशी की गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान आरोपी गणेश रमेश पुजारी हा इसम मारिअप्पा राजू नायर यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ करत होता. मोहने रुग्णालयाजवळच्या पायरीजवळ हा प्रकार सुरू होता. ही वादावादी सुरू असताना आक्रमक झालेल्या आरोपी गणेश पुजारी याने मारिअप्पा नायर याचे डोके पकडून त्याला खेचत नेऊन रुग्णालयाजवळच्या पायरीवर त्याचे डोके आपटल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असुनही गणेश पुजारी याने मारिअप्पा नायर याचे डोके जोराने पायरीवर आपटून त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत मारिअप्पाचा जागीच मृत्यू झाला.
या हाणामारीच्यावेळी गणेश पुजारी इतका आक्रमक झाला होता की कोणाही पादचाऱ्याची मारिअप्पाला वाचविण्यासाठी पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही. ही माहिती तात्काळ खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गणेश पुजारीला पळून जाण्याची संधी न देता त्याला अटक केली. या खुनाचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुजारीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
