कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकनघरमध्ये एका इमारतीच्या तेराव्या माळ्यावरील सदनिकाच्या खिडकीच्या बाजुला रंगकाम करत असलेला एक ४६ वर्षीय रंगारी तोल जाऊन इमारती खालील खोल खड्ड्यात पडला. या रंगारीला तात्काळ इतर साथीदारांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे दाखल केल्यानंतर तपासून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.
मणकेश सिताराम चव्हाण (४६) असे रंगाऱ्याचे नाव आहे. ते रंगारी म्हणून काम करतात. ते मूळचे उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सियारामपूर गावचे रहिवासी आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरातील नवीन, जुन्या इमारतींना रंग देण्याचे काम ते आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने करतात. या मजुराच्या मृत्युप्रकरणी कामगार ठेकेदार गुड्डुकुमार कसौधन (३५) यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तपास करून भारतीय न्याय संहितेच्या २०२३ कलम १९४ प्रमाणे अपमृत्युची नोंद केली आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की मणकेश चव्हाण यांना कामगार ठेकेदार कसौधन यांनी कल्याण पश्चिमेतील रामबाग चिकनघर भागातील राॅयल इमारतीच्या रंगकामासाठी नियुक्त केले होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी या इमारतीत येऊन रंगकाम सुरू केले. इमारतीच्या तेराव्या माळ्यावरील एका सदनिकेच्या खिडकीच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत ते रंग देण्याचे काम करत होते. यावेळी खिडकीत उभे राहून रंग देत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते खिडकीतून बाहेर फेकले जाऊन इमारती खालील एका खोल खड्ड्यात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
ते खड्ड्यात पडताच मोठ्याने आवाज झाला. त्यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, या इमारतीत काम करणारे इतर मजूर घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने मणकेश चव्हाण यांना उपचारासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ही माहिती कामगार ठेकेदार गुड्डुकुमार कसौधन यांनी महात्मा फुले पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे आणि तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. साहाय्यक पोलीस निरीक्षक हुनमंत हुंबे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात नवीन आठ ते २३ माळ्यांच्या इमारतींची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी परांची बांधून भर पावसात मजूर सुरक्षिततेची कोणतेही साधने न वापरता रंगकाम, अंतर्गत सजावटीची कामे करत असल्याचे चित्र आहे.