कल्याण – आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून गांजा आणून तो महाराष्ट्राच्या विविध भागात तस्करीच्या मार्गाने विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि खडकपाडा पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे अटक केली आहे. या टोळीत एकूण १३ जण आहेत. त्यांच्याकडून २८ लाख ७५ हजाराच्या गांजासह एकूण ७० लाखाचा विविध प्रकारचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
मागील पंचविस दिवसांंपासून खडकपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथक या टोळीचा माग घेत होते. कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे जोरदार अभियान गेल्या वर्षीपासून उपायुक्त झेंडे यांनी कल्याण, डोंबिवली परिसरात सुरू केले आहे. या कारवाईत गांजा, अंमली पदार्थ तस्करांचे अड्डे नेस्ताबूत करण्यात आले आहेत. तरीही कल्याण, डोंबिवली शहर परिसरात गुप्तपणे गांजाची विक्री होत असल्याने पोलीस दलात अस्वस्थता होती. या गांजा तस्करांचे मुळ शोधण्याचा प्रयत्न पोलीस पथक करत होते.
२ ऑगस्ट रोजी कल्याण जवळील आंंबिवली रेल्वे स्थानक भागात बनेली रस्त्यावर गस्त घालत असताना उपायुक्त झेंडे यांचे विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांचे संयुक्त पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका वाहनाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली. त्यात गांजाचा साठा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. त्यांच्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गु्न्ह्याचा तपास करताना आंबिवलीत अटक करण्यात आलेल्या तीन इसमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बदलापूर, ठाणे, सोलापूर, तेथून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम पर्यंत तपास केला. या तपासात या शहरांमधील गांजा तस्कर अटक केले. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील दुर्गम जंगल भागात गांजाची शेती केली जात होती. त्या शेतीमधील गांजा महाराष्ट्रात गुप्त मार्गाने तस्कर विक्रीसाठी आणत होते, असे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. विशाखापट्टणम भागातून शहर भागात गांजा आणताना पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्कर या भागात वाॅकीटाॅकीचा वापर करत होते. या १३ तस्करांकडून त्यांच्याकडून २८ लाख ७५ हजाराचा गांजा, रिव्हाॅल्व्हर, जीवंत काडतुसे, वाॅकीटाॅकी दोन संच, पाच तस्करीसाठी वापरलेली वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बाबा शेख, गुफरान शेख, सुनील राठोड, आझाद शेख, शुभ भंडारी, सोनु सय्यद, आसिफ शेख , प्रथमेश नलावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, योगेश जोध अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, मारूती आंधळे, साबाजी नाईक, अनिल गायकवाड, विजय गायकवाड, संदीप भालेराव, जितेंद्र ठोके, सदाशिव देवरे, निसार पिंजारी, राजू लोखंडे, योगेश बुधकर, संदीप भोईर, सुरेश खंडाळे, सुरज खंडाळे, अनंत देसले, अमित शिंदे, कांतिलाल वारघडे, खुशाल नेरकर, सुरेश खंडाळे, अनिल खरसान, राहुल शिंदे यांच्या पथकाने केली.