कल्याण – कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुरबाड रस्त्यावर असलेला ताल बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो, अशा तक्रारी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री ताल बारवर अचानक छापा टाकला. यावेळी बारमध्ये अश्लील नृत्ये, वाद्यवृंद विहित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी बार मालकासह एकूण २३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बार मालक, सेवक, व्यवस्थापक, सहा तोकड्या कपड्यातील नृत्यांगना तथा गायिका, १७ पुरूष ग्राहक यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ताल बारमधील वाद्यवृंद, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि ताल बारमध्ये ग्राहक सेवेतून जमा झालेली २९ हजार रूपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. कल्याण पश्चिमेत मुरबाड रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी ताल बार आहे. या बारवर यापूर्वी अनेक वेळा पोलिसांचे छापे पडले आहेत.
ताल बार उशिरापर्यंत सुरू असल्याचे, तेथे तोकड्या कपड्यांमध्ये काही महिला अश्लील नृत्य करत गाण्यांवर नाचत असल्याच्या आणि ग्राहकांना भुरळ घालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वाढल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ताल बार ग्राहकांच्या वाहनांचा गराडा पडलेला असायचा. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान ताल बारवर अचानक छापा टाकला. त्यावेळी वाद्यवृंदाच्या तालावर सहा महिला तोकडे कपडे घालून गाणी गात असल्याच्या, बिभीत्स हावभाव करत नृत्य करत असल्याचे आणि ग्राहक त्यावर पैसे उधळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा बारवर छापा पडताच ग्राहकांची भंबेरी उडाली. पोलिसांनी बारचे दोन्ही दरवाजे आतून बंद केले.
बारमध्ये सुरू असलेल्या घटनेचा पंचांच्या साक्षीने पंचनामा केला. बारमधील वाद्यवृंदाचे साहित्य जप्त करण्यात आले. बारचा मालक, व्यवस्थापक, सेवक, महिला गायिका, ग्राहकांची माहिती घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ५४, ३(५) अन्वये महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याण शिळफाटा, नेवाळी रस्ता भागात अनेक बिअर बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या बारमध्ये तोकड्या कपड्यांमधील महिला गायिका नृत्य, गायन करत असल्याने जिल्ह्याच्या विविध भागातील ग्राहक याठिकाणी मौजमजेसाठी येत असल्याच्या तक्रारी आहेत. कल्याण, डोंबिवलीच्या पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बिअर बार विरुध्द छापा आणि फौजदारी कारवाई सुरू केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.