कल्याण – १६२ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याणमधील शिवाजी चौकातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाला सन २०२३ -२०२४ चा राज्यातील सर्वात्कृष्ट ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून हा पुरस्कार वाचन संस्कृती वाढविणाऱ्या, ग्रंथालयाचा गुणात्मक विकास करणाऱ्या ग्रंथालयांना देण्यात येतो.
शहरी, ग्रामीण अशा दोन भागात हा पुरस्कार दिला जातो. शहरी भागाचा पुरस्कार यंदा राज्यातून कल्याण सार्वजनिक वाचनालयाला मिळाला आहे. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी म्हणजेच जागतिक ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिक्षण विभागाचे मुख्य सचिव गोपालाचार्य रेड्डी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकु बारस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र ग्रंथालय संघ अध्यक्ष गजानन पोटेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील होते. ग्रंथालयाचा गुणात्मक विकास, वाचक संस्कृती, सदस्य वृध्दिंगत होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा अनेक निकषांवर या पुरस्कारासाठी शासनमान्य ग्रंथालयांची निवड केली जाते. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात एक लाखाहून अधिक विविध प्रकारची पुस्तके आहेत. वाचनालयाच्या शहराच्या विविध भागात एकूण चार शाखा आहेत. वाचनालयाचे तीन हजाराहून अधिक सदस्य आहेत. हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांसाठी वाचनालयात स्वतंत्र दालने आहेत.
वाचनालयाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. लॅपटॉपची एक कळ दाबली की काही सेकंदात लाखभर पुस्तकातून वाचकाला आपल्या पसंतीच्या पुस्तकाची निवड करता येते. तेरा वर्षापूर्वी सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मुल्हेरकर यांना ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराने शासनाकडून सन्मानित करण्यात आले होते.
वाचक चळवळ वृध्दिंगत व्हावी म्हणून वाचनालयातर्फे दर महिन्याला विविध वाचनोपयोगी उपक्रम राबविले जातात. दुर्मिळ अशी पुस्तके, ग्रंथ या वाचनालयात आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना यापूर्वी एका पुस्तकातील संदर्भ हवा होता. अनेक वाचनालयांमध्ये शोधूनही तो संदर्भ मिळत नव्हता. तो संदर्भ कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातील एका पुस्तकातून मिळाला होता, असे ग्रंथालयाचे जुने विश्वस्त सांगतात.
१६२ वर्षाची परंपरा कल्याण सार्वजनिक वाचनालयाची असली तरी या वाचनालयाला काळाप्रमाणे अत्याधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. वाचनालयाचे संपूर्ण संगणीकरण करण्यात आले आहे. वाचनालयाच्या गुणात्मक विकासाबरोबर वाचकाला दर्जेदार जुन्या बरोबर नवी अधिकाधिक पुस्तके कशी वाचायला मिळतील याकडे वाचनालयाचा कल असतो. वाचन संस्कृती प्रसारासाठी विविध उपक्रम घेतो. या सर्व कामाची पावती म्हणजे वाचनालयाला मिळालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे. – मिलिंद कुलकर्णी, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, कल्याण.