कल्याण – दिवाळीनिमित्त परिधान करण्यासाठी तिजोरीतून बाहेर काढलेला सोन्याचा सुमारे पाच ते सहा लाख रूपये किमतीचा कल्याण पूर्वेतील एका महिलेचा हार बुधवारी दारात कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या स्वच्छता कामगाराच्या कचऱ्याच्या डब्यात महिलेच्या नजरचुकीने गेला. काही वेळाने महिलेला आपला घरातील सोन्याचा हार कचऱ्याच्या डब्यातून पालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर गेला असल्याचे समजल्यावर पालिका स्वच्छता कर्मचारी आणि खासगी ठेकेदार कंपनीच्या कामगारांच्या प्रयत्नाने या महिलेला कचोरे येथील कचरा संकलन केंद्रावर कचऱ्यातील सोन्याचा हार परत करण्यात आला.

कल्याण पूर्वेत चाळीत राहत असलेल्या एका महिलेने दिवाळी असल्याने घरातील तिजोरीत ठेवलेला सोन्याचा हार सणानिमित्त घालण्यासाठी बाहेर काढला होता. दिवसभर हार घातल्यानंतर या महिलेने रात्री गळ्यातील सोन्याचा हार घरात बाजुला काढून ठेवला होता. सकाळच्या वेळेत झाटलोट करत असताना या महिलेचा सोन्याचा हार या महिलेच्या नजरचुकीने घरातील कचऱ्यात गेला. घरातील कचऱ्याच्या डब्यातून या महिलेने आपला सोन्याचा हार पालिकेककडून कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या मे. सुमित एल्को कंपनीच्या कामगारांच्या स्वाधीन केला.

घरातील आवराआवर करत असताना या महिलेला घरात सोन्याचा हार नसल्याचे समजले. तिने आणि कुटुंबीयांनी घरात सोन्याचा हार शोधला. तो कोठेही आढळला नाही. घरात बाहेरून कोणी आले नाही. घरात चोरी झाली नसताना हार गेला कोठे याचा विचार सुरू असताना, या महिलेला आपण घरात झाडलोट केली. त्यावेळी हार कचऱ्यातून कचऱ्याच्या डब्यात आणि तेथून पालिकेच्या खासगी ठेकेदार कामगारांच्या माध्यमातून कचरा संकलन केंद्रावर गेला असल्याचे समजले.

या महिलेने तातडीने कल्याण पूर्वेतील जे प्रभागातील रस्त्यावर कचरा जमा करणाऱ्या मे. सुमित एल्को कंपनीच्या कामगारांना घरातून सोन्याचा हार कचऱ्यातून गहाळ झाला असल्याची माहिती दिली. या कामगारांनी कल्याण पूर्वेतील जे प्रभागाचे मे. सुमित एल्को कंपनीचे क्षेत्रिय अधिकारी समीर खाडे, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांना भेटण्यास सांगितले. या महिलेने खाडे आणि भालेराव यांची भेट घेऊन त्यांना घडला प्रकार सांगितला. या अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली करून ही महिला राहत असलेल्या भागात कचरा संकलनासाठी कोणते वाहन आणि कामगार गेले होते याची माहिती घेतली.

या महिलेचा रडवेला चेहरा पाहून अधिकाऱ्यांनी विनाविलंब संबंधित कचरा वाहू वाहन आणि त्यावरील कामगारांना कचोरे येथील कचरा संकलन केंद्रावर येण्यास सांगितले. त्या वाहनातील कचरा एका ताडपत्रीवर घेऊन पाच ते सहा कामगार यांनी अधिकारी खाडे आणि भालेराव यांच्या उपस्थितीत कचऱ्याची बारकाईने विगतवारी केली. त्यावेळी त्या वाहनामध्ये महिलेने कचऱ्याच्या डब्यातून टाकलेला हार कामगारांना मिळाला.

सोन्याचा हार मिळताच कचऱ्याने माखलेला तो हार कामगारांनी पाण्याने स्वच्छ केला. खाडे, भालेराव यांनी संंबंधित महिलेला कचोरे केंद्रावर बोलावून घेतले आणि त्यांना त्यांचा सोन्याचा हार परत केला. यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव आणि आनंदाश्रू पाहून काही क्षण उपस्थित अधिकारी, कामगार गहिवरले. या महिलेने कामगारांच्या प्रामाणिकबद्दल समाधान व्यक्त केले.