जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्व आणि पश्चिम

शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांत कल्याणमध्ये बिनसल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात युतीमधील या धुसफुशीचे पडसाद उमटू लागले आहेत. कल्याण पश्चिमेची जागा भाजपकडून हिसकावून घेतल्याने आनंदात असलेल्या शिवसेना नेत्यांना येथून भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्या बंडखोरीमुळे घाम फुटला आहे. तर कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना धनंजय बोडारे या उल्हासनगरातील शिवसेना नगरसेवकाने आव्हान दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील कानाकोपरा पिंजून काढत युतीच्या उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्वेत झालेल्या बंडाविषयी मात्र नरमाईचे धोरण स्वीकारल्याने या बंडाला जिल्हा नेतृत्वाचा पाठिंबा असल्याची चर्चाही आता भाजप वर्तुळात आहे.

कपिल पाटील, किसन कथोरे यांच्यापाठोपाठ गणेश नाईकांसारखा तगडा नेता राष्ट्रवादीतून भाजपवासी झाल्याने या पक्षाची ठाणे जिल्ह्य़ातील ताकद शिवसेनेला आव्हान देण्यापर्यंत वाढली आहे. जागावाटपात बेलापूरच्या बदल्यात कल्याण पश्चिमेची जागा भाजपकडून पदरात पाडून घेत पालकमंत्री शिंदे यांनी तह करताना पक्षाची इभ्रत राखली. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील या मतदारसंघात शिवसेना नगरसेवकांची मोठी ताकद राहिली आहे. असे असतानाही पाच वर्षांपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत हेवेदाव्यांचा फायदा उठवत संघाच्या मुशीत वाढलेले नरेंद्र पवार यांनी येथून विजय मिळवला. त्यामुळे जागावाटपाच्या बोलणीत पालकमंत्र्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या पदरात पाडून घेत पवार आणि येथील संघनिष्ठावंतांनाही एकप्रकारे धक्का दिला. येथूनच जिल्ह्य़ातील बंडखोरीचा पाया रचला गेला. पश्चिमेचा धक्का कमी नव्हता म्हणून की काय कल्याण पूर्वेत शिवसेनेचे उल्हासनगरातील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत भाजपला दुसरा धक्का दिला. पूर्वेतील विद्यमान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निवडून येताच भाजपची साथ धरली होती. महापालिका निवडणुकीतही गायकवाड शिवसेना उमेदवारांच्या पराभवासाठी गल्लोगल्ली फिरले होते. त्यामुळे काहीही झाले तरी त्यांना धडा शिकवायचा या इर्षेने पेटलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उघडपणे भाजपविरोधी प्रचार सुरू केला आहे.

बंडाचा बोलविता धनी कोण?

गेल्या काही वर्षांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. युती व्हावी यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेतील नेत्यांपैकी शिंदे एक मानले जातात. ठाणे जिल्ह्य़ात आणि विशेषत: कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत शिंदे यांचा शब्द संघटनेत प्रमाण मानला जातो. येथील खासदारही शिंदे पुत्र डॉ. श्रीकांत असल्याने येथील संघटनात्मक घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असते. असे असतानाही कल्याण पूर्व मतदारसंघात पक्षात उघड बंड झाल्याने भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून बोडारे यांचा बोलविता धनी कोण, अशी जाहीर चर्चा आता सुरू झाली आहे. गणपत गायकवाड यांनी तर थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांनी हे बंड थोपविण्यासाठी काहीच केले नाही असा आरोप केला आहे. या दोन मतदारसंघांत युतीत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचा परिणाम लगतच असलेल्या उल्हासनगर, कल्याण ग्रामीण यांसारख्या मतदारसंघांतही दिसल्यास आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan sena bjp alliance thane abn
First published on: 13-10-2019 at 00:53 IST