कल्याण : कल्याण शीळफाटा, खोणी तळोजा रस्त्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वेळेत अवजड वाहनांना मुभा आहे. या वेळेनंंतर अवजड वाहनांना या रस्त्यावर मुभा नाही. तरीही खोणी तळोजा, कल्याण शीळफाटा, गोविंदवाडी रस्त्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस त्यांचे साथीदार वाहतूक सेवकांच्या मदतीने अवजड वाहन चालकांशी संगनमत करतात आणि दिवसा अवजड वाहने तळोजा, शिळफाटा रस्त्यावर सोडत असल्याच्या तक्रारी या रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

सोमवारी (ता. ८) पहाटे एक अवजड कंटेनर भिवंडीकडून दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने पत्रीपुलावरून शिळफाटा दिशेने जात होता. या अवजड कंटेनर चालकाला गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता येथेच थांबून ठेवणे हे गोविंदवाडी वळण रस्ता ते पत्रीपूल दरम्यान तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांचे काम होते. या तिठ्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी आपल्याकडून पैसे घेतले आणि आपणास पत्रीपूल ते शिळफाटा दरम्यानच्या प्रवासासाठी सोडले, अशी माहिती या कंटेनरवरील चालकाने प्रवाशांना दिली.

आपण सोमवारी सकाळी सहा वाजता शिळफाटा, खोणी तळोजा रस्त्याने पुढे जाणार होतो. जागोजागी आपणास वाहतूक पोलिसांनी अडवून ठेवले, अशी तक्रार या कंटनेर चालकाने प्रवाशांकडे केली. आपण शिळफाटा रस्त्याने येत असताना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान आपला कंटेनर शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा भागातील मेट्रो काम सुरू असल्याच्या ठिकाणी एक तास वाहतूक पोलिसांनी अडवून ठेवला. आपल्याकडून सहा हजार रूपये मागण्यात येत होते. काही पैसे आपण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने वाहतूक पोलिसाजवळील साथीदाराच्या मोबाईलवर जमा केले. आपल्याकडे सहा हजार रूपये वाहतूक पोलीस मागत होते. शेवटी दोन वाहनांचे त्यांनी दोन दोन हजार रूपये घेतले. हे पैसे वाहतूक पोलिसाजवळील वाहतूक सेवकाने घेतल्याची कबुली कंटेनर चालकाने प्रवाशांना दिली.

सोमवार कामाचा पहिला दिवस. सकाळीच कल्याण शिळफाटा तेथून काटई मार्गे खोणी तळोजा या रस्त्यावरून अवजड कंटेनर धावत असल्याने आणि या कंटेनरमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक प्रवासांनी या कंटेनर चालका रोखले आणि कंटेनर बाजुला उभा करून ठेवण्याची सूचना केली. आपण पहाटे चार वाजताच या रस्त्यावरून पुढे जात होतो. कल्याणला पत्रीपुलाजवळ, शिळफाटा रस्त्यावर आपणास वाहतूक पोलिसांनी रोखून धरले. त्यांची पैशाची मागणी पूर्ण केली तेव्हा त्यांनी आपणास पुढच्या प्रवासास मुभा दिली, अशी तक्रार या कंटनेर चालकाने प्रवाशांकडे केली. या प्रवासी कंटनेर चालकाच्या संभाषणाची दृकश्राव्य ध्वनी चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे.

वाहतूक पोलीसही खोणी तळोजा, कल्याण शिळफाटा रस्त्यावर दिवसा अवजड वाहने सोडून वाहतूक कोंडी करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. नवी मुंबईकडून तळोजामार्गे खोणीकडे येणारी अवजड वाहने त्या भागातील वाहतूक पोलीस चिरीमिरी घेऊन सोडतात. ही वाहने खोणी तळोजा रस्त्यावर काटई बदलापूर रस्त्यावर आली की याठिकाणी असेच व्यवहार होतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.