कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील रिक्षा चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवासी हैराण आहेत. सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान एका मुजोर रिक्षा चालकाने एका नोकरदाराच्या अंगावर रिक्षा घालून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाने यासंदर्भात रिक्षा चालकाला जाब विचारताच, संबंधित रिक्षा चालकासह इतर रिक्षा चालकांनी प्रवाशाला फैलावर घेऊन दमदाटी केली.
असे अनुभव दररोज प्रवासी कल्याण रेल्वे स्थानक भागात घेतात. या घडल्या प्रकाराबाबत प्रवाशाने कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांच्याकडे तक्रार केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संंबंधित रिक्षा चालकावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेली माहिती अशी की, ज्या प्रवाशाच्या अंगावर रिक्षा चालकाने रिक्षा घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. ते प्रवासी भिवंडी येथे राहतात. सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान हा प्रवासी नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे स्थानका बाहेर भिव्ंडी येथे जाण्यासाठी आले. ते भिवंडी येथे जाण्यासाठी रिक्षा चालकांना विचारणा करत होते. त्या वेळी एमएच ०५ सीपी ३०१२ हा रिक्षा चालक प्रवाशाच्या समोर रस्त्याच्या विरुध्द मार्गिकेतून आला.
या रिक्षा चालकाने आपल्या ताब्यातील रिक्षा समोरील प्रवाशाला कळण्याच्या आत त्यांच्या अंगावर घातली. अचानक रिक्षा अंगावर आल्याने प्रवासी घाबरला. प्रवाशाने सावधानता बाळगल्याने तो थोडक्यात बचावला. अन्यथा प्रवाशाला दुखापत झाली असती. आपण काही केले नसताना तुम्ही माझ्या अंंगावर रिक्षा का घातली, असा प्रश्न प्रवाशाने रिक्षा चालकाला करताच एमएच ०५ सीपी ३०१२ या रिक्षेतील चालकाने आक्रमक होत आणि अरेरावी करत ‘तुम्हाला काही लागले का. काही झाले असते तर मग बघून घेतले असते’, आता तुम्ही कशासाठी मला जाब विचारता अशी उलट उत्तरे केली.
प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची सुरू असताना रिक्षा वाहनतळावरील इतर रिक्षा चालक बेशिस्त रिक्षा चालकाची बाजू घेत त्या ठिकाणी एकत्र आणि त्यांनी प्रवाशाला उलटसुलट उत्तरे करून तुम्हाला काही लागले नाही ना, मग कशासाठी वाद घालता, असे प्रति प्रश्न केले.
रिक्षा चालक संघटित झाले असल्याने ते आपणास नाहक त्रास देतील असा विचार करून प्रवाशाने तेथून काढता पाय घेतला. सोमवारी रात्री घडल्या प्रकाराची प्रवाशाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. कल्याण, डोंबिवलीत रात्रीच्या वेळेत रिक्षा चालक प्रवाशांशी भाडे, इच्छित स्थळी जाण्यावरून वाद घालत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
सोमवारी रात्री एका रिक्षा चालकाने रस्त्याच्या विरुध्द मार्गिकेतून येऊन एका प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशी तक्रार प्रवाशाकडून प्राप्त झाली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. – आशुतोष बारकुळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.