कल्याण – कल्याण पूर्व भागात राहत असलेल्या आणि शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या एका शिक्षिकेच्या मोबाईलचे सीम कार्ड परस्पर बंद करून या मोबाईलच्या माध्यमातून सायबर भामट्याने गेल्या आठवड्यात शिक्षिकेच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामधून टप्प्याने दोन लाख रूपये काढून घेऊन अपहार केला आहे. या शिक्षिकेने या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अनिता खाडे असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या कल्याण पूर्वेतील देवळेकरवाडी भागात कुटुंबीयांसह राहतात. त्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शहापूर तालुक्यातील खर्डी भागातील मुसळेचापाडा शाळेवर शिक्षिका आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री त्यांनी मोबाईल चार्जकरून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत जात होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलची वेळ पाहण्यासाठी त्यांनी मोबाईल पाहिला तर त्याला रेंज नव्हती. काही तांत्रिक कारण असेल म्हणून त्यांनी मोबाईल पर्समध्ये ठेवला. शाळेत गेल्यावरही त्यांंच्या मोबाईलला रेंज नव्हती.
शाळेतून परतल्यावर त्यांनी खडकपाडा येथील जिओ गॅलरीत जाऊन मोबाईल दाखवला. त्यावेळी त्यांना तुमचा मोबाईल हरविला असल्याची नोंद असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. शिक्षिकेचा आधारकार्ड क्रमांक पाहून जिओ गॅलरीतील कर्मचाऱ्याने शिक्षिकेचा मोबाईल पुन्हा चालू करून दिला. मोबाईल सुस्थितीत झाला म्हणून शिक्षिकेला आपल्या मैत्रिणीला काही रक्कम ऑनलाईन माध्यमातून पाठवायची होती म्हणून त्यांनी पेटीएम उपयोजन सुरू केले.
त्यावेळी त्यांना आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामधून दोन दिवसाच्या कालावधीत आठ व्यवहारांच्या माध्यमातून २० हजार, ३० हजार, ४० हजार, नऊ हजार अशा पध्दतीने एकूण दोन लाख रूपये अज्ञाताने काढून घेतले असल्याचे निदर्शनास आले. शिक्षिका खाडे यांनी तात्काळ यासंदर्भात खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन चौकशी केली. बँक खात्यातून अज्ञाताने दोन लाख रूपये काढून घेतले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आपली सायबर भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यावर शिक्षिकेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे. सायबर भामटे आता दुसऱ्याच्या मोबाईलमधील सीमकार्ड बंद करून परस्पर पैसे काढत असल्याचा हा नवीन प्रकार आता उघडकीला आला आहे. कल्याण, डोंबिवली शहरात दररोज ऑनलाईन माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. आता बँक खात्यात पैसे ठेवायचे की नाही, असा प्रश्न नागरिक करत आहेत.