तुमच्यावर करणी झाली आहे. या करणीमुळे तुमच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. पूजाअर्चा करुन तुमच्यावर केलेली करणी काढते अशी बतावणी करुन एका घर काम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या वयोवृद्ध मालकाला लाखो रुपयांचा गंडा घातला होता. डोंबिवली येथील खोणीगाव परिसरात राहणारे वसंत समर्थ यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी मोलकरीण त्रिशा केळूसकर हिला अटक करुन तिच्याकडून १६ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

तिच्या साथीदार महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असा आवाहन डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केले आहे.

डोंबिवली पलावा हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वसंत समर्थ हे एकटेच राहतात, त्यांचा मुलगा हा परदेशात स्थायिक झालेला आहे . वसंत समर्थ हे एकटेच राहत असल्याने त्यांच्या घरात त्रिशा केळुस्कर ही महिला घरकाम करते. अनेक महिन्यांपासून असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्रिशा हीने वसंत यांना तुमच्या घरावर कोणीतरी करनी केली आहे. मी एका महिलेला ओळखते तिच्याकडे वेगळे शक्ती आहे, ती तुमची पिडा दूर करेल असे सांगितले. वसंत यांना देखील ही बाब खरी वाटली. यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी पैसे लागतील असे सांगत त्रिशाने पैशांची मागणी केली. तसेच मरियम नावाच्या महिलेचे वसंत समर्थ यांची भेट घालून दिली. त्यानंतर या दोघींनी मिळून समर्थ यांच्या घरात पूजेचा दानधर्म जेवणाचा घाट घातला. या माध्यमातून त्यांनी वसंत समर्थ यांच्याकडून १५ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच वस्तू स्वरूपात घड्याळ म्युझिक सिस्टम कपडे सेलेरो कंपनीची कार अशा वस्तू घेतल्या. काही दिवसांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे वसंत यांच्या लक्षात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी वसंत समर्थ यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मानपाडा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या पथकाने तत्काळ त्रिशाचा शोध घेऊन तिला अटक केली. त्रिषाची साथीदार मरियम फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तसेच या महिलांनी लुबाडलेला सर्व मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला . याआधी या महिलांनी अशाप्रकारे कोणाला लुबाडले आहे का याचा शोध देखील मानपाडा पोलीस घेत आहेत.