कल्याण – शासन निर्देश आणि प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच्या पुढाकाराने मंगळवारी कल्याण पश्चिमेतील रेल्वे तिकीट खिडकीजवळील रिक्षा वाहनतळावर मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे प्रवाशांना रिक्षेसाठी रांगेत उभे न राहता स्वतंत्रपणे प्रवासाची मुभा मिळणार आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून शेअर पध्दतीने कल्याण पश्चिम शहराच्या विविध भागात प्रवासी वाहतूक रिक्षा चालक करतात. एका रिक्षेत एका भागातील तीन प्रवासी बसले की प्रवासी शेअर पध्दतीने भाड्याचे विभागणी करून रिक्षा चालकाला प्रवासी भाडे देतात. या पध्दतीने प्रवाशांना रिक्षा वाहनतळावर रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक प्रवासी रिक्षा वाहनतळावर आल्यानंतर रिक्षा चालकांना मीटर टाकून प्रवासी वाहतूक करण्यास सांगत होते.

कल्याण, डोंबिवलीत मागील अनेक वर्षापासून मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक केली जात नाही. त्यामुळे बहुतांशी रिक्षा चालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला नकार देत होते. या विषयावर प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्या वाद होते. हे प्रकार तक्रारीच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यापर्यंत पोहचत होते.

कल्याण, डोंबिवली शहरात अनेक प्रवासी मीटरप्रमाणे प्रवास करण्यास तयार आहेत. त्यांना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करता येत नसल्याने कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी गेल्या आठवड्यात एक आदेश काढून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी दोन रांगांमध्ये रिक्षेचे नियोजन करण्याचे निर्देश रिक्षा संघटनेला दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका रांगेतून मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा टॅक्सी चालक महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, पदाधिकारी संतोष नवले, जितेंद्र पवार, शरीफ शेख, विजय डफळ, अनिल जगताप, बंडू वाडेकर, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका टपले, अक्षया बनसोडे, प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणे कल्याण पूर्व, डोंबिवली शहरात अशाप्रकारची मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ प्रायोगिक तत्वावर दोन रांगांमधून मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा प्रवाशांना उपलब्ध असतील. मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळाला तर या रांगा आणि रिक्षांचा संख्या वाढविण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर हा पथदर्शी प्रकल्प मग डोंबिवली क्षेत्रात राबविला जाईल. – आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. कल्याण.

डोंबिवली शहरात मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासी वाहतूक सुरू करावी ही अनेक वर्षांची प्रवाशांबरोबर रिक्षा चालक संघटना कृती समितीची शासनाकडे मागणी आहे. कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीतही हा उपक्रम लवकरच सुरू करावा. – शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षा चालक मालक संघटना. डोंबिवली.