कल्याण- विदेशातून आपल्या नावाने एक कुरिअर आले आहे. या कुरिअरवर आपणास सीमा शुल्क, प्राप्तिकर आणि इतर वहन कर भरावा लागणार आहे. हे शुल्क भरणा केले नाहीत तर आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, अशी भीती कल्याण मधील एका वित्तीय कंपनीतील उच्चपदस्थ महिलेला दाखवून तिच्याकडून तीन भामट्यांनी गेल्या महिन्यात १० दिवसाच्या अवधीत १३ लाख ४६ हजार ५०० रुपये ऑनलाईन पध्दतीने उकळले आहेत. संपूर्ण शुल्क भरणा केल्यानंतर कुरिअर नाहीच, समोरील व्यक्तिंकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले. या सगळ्या प्रकारात काळेबेरे असल्याचा संशय आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीत धुळीच्या लोटांमुळे प्रवासी, वाहन चालक हैराण

डाॅ. अल्बर्ट थाॅम्पसन, तोतया प्राप्तीकर अधिकारी सौम्या आणि अन्य एक अशा तीन जणांनी ही आर्थिक फसवणूक केली आहे. श्रृतिका सोनजे (रा. अन्नपुर्णा संकुल, सिंदीगेट, कल्याण) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्या एका वित्तीय कंपनीत उच्चपदस्थ आहेत. २६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यापूर्वी तक्रारदार श्रृतिका सोनजे यांच्या मोबाईलवर डाॅ. अल्बर्ट थाॅम्पसन या अपरिचित इसमाने लघुसंदेश करुन त्यांना त्यांचा निवासाचा पत्ता विचारला. आपणास पत्ता कशासाठी पाहिजे. आपण कोण आहात अशी विचारणा श्रृतिका यांनी अल्बर्ट यांना केली. या प्रकरणात खूप तातडीचे साहाय्य हवे आहे, असे ते म्हणाले. 

त्यानंतर दोन तासांनी अल्बर्ट यांनी श्रृतिका यांना व्हाॅट्सप वरुन संपर्क करुन सांगितले, भारता मधील एक डाॅक्टर माझे मित्र आहेत. त्यांना आता भारतात स्थिरस्थावर व्हायचे आहे. त्यांच्यासाठी मी सोने, हिरे हार आणि ८० हजार पौंड्स असा ऐवज त्यांना कुरिअर करायचा आहे. अनेक दिवस झाले. त्यांचा संपर्क मला होत नाही. त्यामुळे मी डाॅक्टरांच्या नावे असलेले ऐवज असलेले कुरिअर तुमच्या पत्त्यावर पाठविले आहे. ते तुम्ही ताब्यात घ्या, असे सुचविले.

हेही वाचा >>> टिटवाळा ते कल्याण-नगर महामार्ग गोवेली येथे वर्तुळकार रस्त्याने जोडणार ; एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर श्रृतिका यांना तुमचे कुरिअर आले आहे. तुम्हाला ते ताब्यात घेण्यापूर्वी तुम्हाला सीमा शुल्क, प्राप्तिकर भरावा लागेल. हे नियमबाह्य पध्दतीने कुरिअर तुम्ही मागविले आहे. याप्रकरणी तुमच्यावर सीमा शुल्क, प्राप्तीकर विभाग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करू शकते, या कुरिअर प्रकरणी भारतात विविध शुल्क, कराच्या प्रक्रिया तुम्हाला पार पाडाव्या लागतील, असे तोतया प्राप्तिकर अधिकारी सौम्या यांनी श्रृतिका यांना सांगून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. आपल्याशी सीमा शुल्क, प्राप्तिकर अधिकारी बोलतात आणि या सगळ्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी श्रृतिका यांनी समोरील सुचनेप्रमाणे शुल्क, करांसाठी टप्प्याने १३ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन भरणा केले. एवढी रक्कम भरणा केल्यानंतर कुरिअर येईल म्हणून त्या वाट पाहत बसल्या. त्यानंतर महिनाभरात कुरिअर नाहीच पण संपर्क करणाऱ्या भामट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक भामट्यांनी केली आहे म्हणून श्रृतिका सोनजे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. या वाढत्या ऑनलाईन फसवणुकीमुळे नागरिक हैराण आहेत.