बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले भाजपचे निवडणूक प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी बदलापुरात ८० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती दरम्यान इच्छुक उमेदवार हे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही भाजपकडून शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मकता दाखवण्यात आली होती. मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीकाही करण्यात आली होती.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे. सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांची चाचणी आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. भाजपच्या वतीने गेल्या दोन आठवड्यांपासून इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांच्या प्रभागात वरिष्ठ नेत्यांकडून प्रचार केला जातो आहे. बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यात भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात उघड शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. दोघांनी एकमेकांना स्वबळावर लढण्याचे आव्हान दिले. त्याच वेळी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी अचानक महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती जाहीर केली. त्यावेळी शिवसेनेला विचारात घेतले नव्हते. मात्र त्यानंतर आम्ही शिवसेनेसोबतही युती करण्यास तयार असल्याचे कथोरे यांनी जाहीर केले होते. अशा युतीबाबत शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी नकारात्मकता दर्शवली होती.
त्यानंतर भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी तर ठाणे जिल्हा ग्रामीण मधील निवडणुकांसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली. त्यानंतर शनिवारी कपिल पाटील यांनी बदलापुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. या संवादात भाजपचे इच्छुक उमेदवार शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून आल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार शक्य तिथे युती करण्याच्या सूचनांवर काम केले जाईल. याबाबत स्थानिक शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी यापूर्वीच संपर्क झाला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. याबाबत शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
युती सर्वांच्याच फायद्याची
दहा वर्षानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये युतीत लढणे सर्वांसाठीच सोयीचे होणार आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे युती झाल्यास त्यात माघार कोण घेईल हा मोठा प्रश्न आहे. येत्या काळात बदलापूर महापालिके होण्याची शक्यता आहे. अशा वेळी ही शेवटची नगरपालिका निवडणूक असेल. त्यामुळे सर्वांनाच नगरसेवक म्हणून सभागृहात जाण्याची इच्छा आहे. मात्र युती झाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची अनेकांनी तयारी दाखवली आहे. काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
