‘कशासाठी पोटासाठी’ हा जगण्याचा मूलमंत्र आहे. उदरभरण ही जीवनातील अत्यंत प्राथमिक अशी गरज आहे. मात्र हे यज्ञकर्म करताना जिभेचे चोचलेही पुरविले जातात. धावपळीच्या जीवनशैलीत घरून नाश्ता करून निघणे अनेकांना शक्य होत नाही. मग जाण्या-येण्याच्या मार्गावरील काही खास ठिकाणं निवडून तिथे पोटपूजा केली जाते. सर्वसाधारणपणे बहुतेकांना चमचमीत खायला आवडते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भरपेट जेवणाऐवजी थोडे, परंतु चटपटीत खाणे अनेकजण पसंत करू लागले आहेत. त्यातूनच सायंकाळी खवय्यांची पावले सहजपणे डोसा, दाबेली, पावभाजी, फ्रॅन्की आदी पदार्थाकडे वळू लागली आहेत. ठाण्यातील कर्मा स्नॅक्स कॉर्नरकडे अशाच चटकदार पदार्थाना सध्या अधिक मागणी आहे.
फ्रॅन्की हा अलीकडच्या काळात अधिक लोकप्रिय झालेला पदार्थ. कर्मा स्नॅक्स कॉर्नरकडेही फ्रॅन्कीला सर्वाधिक मागणी आहे. घरून दिलेल्या डब्यातील पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला की रुचिपालट म्हणून हल्ली फ्रॅन्की खाल्ली जाऊ लागली आहे. मैद्याची पोळी लाटून केलेली ही फ्रॅन्की खवय्यांना अधिक आवडू लागली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांमध्ये फ्रॅन्की मिळते. ‘व्हेज फ्रॅन्की’ हा स्वस्त आणि मस्त प्रकार आहे. त्यामध्ये बटाटय़ाची भाजी, चटणी, कोबी, कांदा आदी पदार्थ असतात. त्यानंतर शेजवान फ्रॅन्कीला अधिक मागणी आहे. सोबत दिली जाणारी शेजवान चटणी कर्मा स्वत: तयार करतात. त्यामध्ये मिरची पावडर, आलं-लसूण पेस्ट आदी जिन्नस टाकले जातात. चीज, बटर आदी पदार्थामुळेही या फ्रॅन्कीला अधिक चव प्राप्त होते. त्यामुळे ‘कर्मा स्नॅक्स कॉर्नर’जवळून जातानाही या पदार्थाचा सुगंध नाकात शिरतो. शाकाहारी फ्रॅन्कीप्रमाणेच इथे मांसाहारी फ्रॅन्कीही उपलब्ध आहेत. त्यातही चिकन चीज फ्रॅन्की, चिकन एग फ्रॅन्की म्हणजे मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणीच ठरतात. चिकन मंच्युरियन चीज फ्रॅन्कीमध्ये मंच्युरियन टाकले जाते. या मंच्युरियनची चव घेत घेत आणखी फ्रॅन्की खाण्याची इच्छा झाली तरी खाऊ शकत नाही. याचे कारण एका फ्रॅन्कीनेच पोट भरून जाते. येथे नूडल्स फ्रॅन्कीलाही अधिक मागणी आहे. त्यामुळे दरदिवशी तब्बल दहा ते १५ किलो नूडल्स सहज लागतात. त्याखालोखाल चिकन फ्रॅन्कीला मागणी आहे. वर्दळीचे ठिकाण असल्याने मांसाहारी फ्रॅन्कीसाठी १०-११ किलो चिकन लागते. येथील चिकन फ्रॅन्की खाताना चिकन चिलीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एग पनीर फ्रॅन्कीमध्ये अंड आणि पनीर असा दुहेरी बेत असतो. पनीर आणि अंड या जोडीतून एक वेगळीच भन्नाट चव तयार होते. त्याला कोबी, कांदा, शेजवान चटणीची फोडणी असते. त्यामुळे ही फ्रँन्की अधिक पौष्टिक आहे. शाकाहारी खवय्यांसाठी मंच्युरियन फ्रॅन्की उपलब्ध आहे. मेयोनीज शेजवान चीज फ्रॅन्की खाताना खवय्ये हमखास दाद देतात. दुकान छोटे असल्यामुळे येथे उभे राहून खावे लागते. शिवाय येथे प्रथम कुपन घेऊन मग त्या कुपनाद्वारे आपणास हवी ती गरमागरम फ्रॅन्की बनवून दिली जाते. चिकन गार्लिक चीज फॅ्रन्कीसाठीही इथे गर्दी जमलेली दिसते. ‘कर्मा स्नॅक्स’ हे कॉर्नर ठाणे रल्वे स्थानकाबाहेरच असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या खवय्यांची पावले सहजपणे इथे वळतात. विशेषत: सकाळ-संध्याकाळी दुकानात खूप गर्दी असते. दरदिवशी साधारण २०० मैद्याच्या पोळ्या सहज संपतात, असे कर्मा यांनी सांगितले. नूडल्स मेयोनीज चीज फ्रॅन्कीलाही येथे मागणी आहे. सायंकाळच्या वेळेत मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत मारत येथे फ्रॅन्की खाल्ली जाते. गरमागरम नूडल्स खातानाही येथे मजा येते. या सर्व फ्रॅन्की २० ते ५५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फ्रॅन्कीमध्ये घातले जाणारे सर्व जिन्नस हे कर्मा स्वत: तयार करतात. त्यामुळे ‘टेस्ट मे बेस्ट’ असणारी ही फ्रॅन्की चटपटीत आणि चमचमीत खाण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
कर्मा स्नॅक्स कॉर्नर
- ठाणे रल्वे स्थानकाबाहेर, ठाणे (प.)
- कधी- सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत