ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या हद्दीवर, अंबरनाथ तालुक्याच्या भौगोलिक हद्दीच्या सीमेवर आणि मलंग गडाच्या पायथ्याशी कातकरी वाडी आहे. या वाडीत विठ्ठल मंदिर आहे. म्हणून वाडीला विठ्ठलवाडी म्हणून ओळखले जाते. डोंबिवली, कल्याणहून काटई नाक्याला वळसा घेऊन बदलापूर पाइप लाइन रस्त्याने निघाले, की खोणीजवळील तळोजा रस्त्याने, उसाटणे फाटय़ावरून कातकरी वाडीत जाता येते. किंवा नेवाळी, मलंगवाडीच्या पायथ्यातून वाडीच्या दिशेने जाता येते. शहरापासून पंधरा किलोमीटरचा हा प्रवास आहे.

कातकरी वाडी (विठ्ठलवाडी)

कातकरी समाज म्हणजे पूर्वीपासून व्यवसाय, मजुरीच्या निमित्ताने भटकंती करणारा समाज. स्वत:च्या मालकीची जमीन नाही. मग, गावोगावच्या पाटलांच्या जमिनीवर, गावठाण जमिनीवर झोपडय़ा बांधायच्या आणि पाटलाच्या घरी आयुष्यभर चाकरी करायची. अथवा गाव परिसरात मोलमजुरी करून चरितार्थ चालवायचा. गाव परिसरातील ओढय़ांमध्ये जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूने साडय़ा आडव्या लावून पाणी अडवायचे आणि मधल्या खोंगळीतील पाण्याचा जमिनीवर उपसा करून मासे पकडायचे, अशी कातकरी समाजाची मासे पकडण्याची अनोखी पद्धत आहे. पावसाळ्याच्या वेळेत भाताची रोपे तयार झाल्यावर राब, रोमटी (शेतात उगवलेले चौकोनी भागातील भाताचे बी) खणण्यासाठी (त्याला ‘पहाटा’ म्हणतात) कातकरी समाजाचे हात एकदा चालायला लागले, की भलेभले शेतकरी त्यांच्या समोर नतमस्तक होतात. असा हा कष्टकरी, मेहनत करणारा समाज आहे. कातकरी समाजातील व्यक्ती एकमेकांशी मराठीतच बोलतात, पण भाषेचा एक वेगळा लहेजा त्यात दिसून येतो.
उसाटणे रस्त्यावरून कातकरी वाडीत प्रवेश करेपर्यंत खोल खड्डे पडलेला कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे अशक्यच, रात्रीच्या वेळेत या रस्त्यावरून चालणेही शक्य नाही. केडीएमटी परिवहन विभागाच्या दिवसातून चार ते पाच बस या रस्त्यावरुन ये-जा करतात. बस आली नाही, की प्रवास बंद. अन्यथा दोन किलोमीटरचा पायी प्रवास करून मलंगवाडी किंवा उसाटणे बस थांब्यावर जाऊन पुढील प्रवास करायचा. असे वाडीचे दळणवळण. कातकरी वाडीत प्रवेश करतानाच, रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर करवंद, जंगली झुडपं, वाळलेले गवत आपले स्वागत करते. त्याच वेळी वाडी किती दुर्गम भागात आहे याची चाहूल लागते. वाडीत प्रवेश केला, की कच्चे मातीचे स्वच्छ रस्ते, अंतर ठेवून असलेली घरांची उभारणी. घरातील न्हाणीघरातून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर जाऊ नये म्हणून सांडपाणी अडविण्यासाठी प्रत्येक घराच्या न्हाणीघराच्या बाहेर शोष खड्डे तयार केलेले. गावाच्या मध्यभागी हिरवीगार फुलावर आलेली फळे देण्यासाठी सज्ज असलेली जांभळाची झाडे. चिंच, आंब्यांची झाडे. बांबूची बने. ४५ घरांचे हे गाव. गावात २७८ लोकवस्ती आहे. दोन ते तीन भाऊ एकाच घरात वर्षांनुवर्षे एकत्र राहत असल्याचे चित्र कातकरी वाडीत दिसते. सुशिक्षित समाजातून एकत्रित कुटुंब पद्धतीचा शेवट होत असताना, कातकरी वाडी मात्र एकत्रित कुटुंब पद्धतीची समाजातील जुनी परंपरा अद्याप टिकवून आहे. शासनाकडून झोपडीसाठी मिळालेल्या निधीतून काहींनी भिंतीची दुपाखी घरे बांधली आहेत. काहींची पारंपरिक दुपाखी जमिनीला टेकलेली कुडाची घरे आहेत. घरे एकदम आटोपशीर, जमीन शेणाने सारवलेली. लाकडी पलंग, खुच्र्या असे आटोपशीर फर्निचर घरात.
प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. चुलीसाठी आजूबाजूच्या जंगलातून फाटय़ा (लाकडे) आणली जातात. जळणासाठी लागणारे फाटय़ांचे ढीग घरांच्या आसपास दिसतात. वाडीतील प्रत्येक घर कष्टकरी. हातावर कमवायचे, मग खायचे. त्यामुळे दर महिन्याच्या गॅस सिलिंडरसाठी पाचशे रुपये कोठून आणायचे, असा प्रश्न वाडीतील बाळाराम वाघे करतात. ते श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. गावात एक विहीर, चार कूपनलिका आहेत. तीन बंद आहेत. एक कूपनलिका, विहिरीचे पाणी वाडीला पुरसे असते. सकाळी उठून मलंग गडाच्या दिशेने उगवणाऱ्या सूर्याला आणि विठ्ठलाला नमस्कार करून, घरात व्यवस्था लावून, मुलांना शाळेत पाठविण्याची सोय करून सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर पडायचे, हा घरातील मोठय़ा व्यक्तींचा शिरस्ता आहे.
संस्कारांचे धडे
ब्राह्मण करवले गाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कातकरी वाडीचा समावेश आहे. या वेळी कातकरी वाडीला सरपंचपदाचा मान मिळाला आहे. जनाबाई वाघे महिला सरपंच गावचा कारभार पाहत आहेत. कातकरी समाजाची एकूण वाटचाल पाहिली तर हा समाज भटकंती करणारा आहे. पण, कातकरी वाडीतील ग्रामस्थांशी बोलल्यानंतर ही मंडळी अनेक वर्षांपासून एकाच जागी राहत आहेत. गावची जमीन गावठाण असली तरी पिढय़ान् पिढय़ा ही मंडळी आपले घर, अंगण असे भौगोलिक क्षेत्र सांभाळून आटोपशीर कातकरी वाडीत राहते. आजूबाजूच्या गावांतील राहणीमान, विकासाकडे सुरू असलेला गावांचा प्रवास पाहून कातकरी वाडीतील प्रत्येक स्त्री, पुरुष स्वत:ला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. वाडीत इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. मुले नियमित शाळेत जातात. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवन आणि जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या उसाटणे येथील बैठकीला कातकरी वाडीतील स्त्री, पुरुष जातात. लहान मुलांसाठी दर रविवारी वाडीत बैठकीच्या माध्यमातून संस्कारवर्ग चालविले जातात. उपलब्ध परिस्थितीत जगायचे कसे, व्यसनमुक्ती, अहंकार, दंभ न ठेवता जीवनाचा प्रवास कसा करायचा अशी माहिती या बैठकीतून मिळते, असे बाळाराम वाघे सांगतात. वाडीत नागरी सुविधा मिळाव्यात, काही सरकारी योजना आणण्यासाठी, तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी गावातील कार्यकर्ते समीर भंडारी पुढे असतात. गावातील एकोपा कायम राहावा, वाद तंटे निर्माण होऊ नयेत याची वाडीत काळजी घेतली जाते, असे ग्रामस्थ नाना कातकरी यांनी सांगितले.
उपजीविकेचे साधन
वर्षांतील बारा महिने कातकरी वाडीतील स्त्री, पुरुष दैनंदिन उपजीविकेसाठी कष्ट, मेहनत, मोलमजुरी करतात. ऋतुमानाप्रमाणे कोणत्या हंगामात काय व्यवसाय करायचा, हे कातकरी वाडीने ठरवून घेतले आहे. कातकरी वाडीच्या आसपास असलेल्या डोंगर, दऱ्यांमध्ये करवंदाची मोठय़ा प्रमाणात झुडपं आहेत. आंबे, जांभळांची झाडे गावाच्या परिसरात आहेत. मार्चमध्ये कच्ची करवंदं खुडून ती पळसाच्या पानांच्या द्रोण (डोमा)मध्ये ठेवून ती मुख्य रस्त्यावर बसून पाच ते दहा रुपयांमध्ये विकली जातात. करवंद पिकली की त्यांचीही अशीच विक्री केली जाते. हा हंगाम चालू असताना आंबे, जांभळांचा हंगाम सुरू असतो. सुरुवातीला कच्चे लहान आंबे(कैऱ्या) विक्रीला नेले जातात. नंतर आंबा पिकायला लागला की तोही टोपलीमध्ये भरून त्याची विक्री केली जाते. अख्खी कातकरी वाडी विशेष करून स्त्रिया, लहान मुले रानमेवा विक्रीचा व्यवसाय करतात. उसाटणे फाटा, नाऱ्हेण गाव, मलंगवाडी बाजार, कल्याण येथील बाजारात हा रानमेवा विकला जातो. लहान मुले परिसरातील गावात फिरून रानमेव्याची विक्री करतात. या माध्यमातून तीन महिन्यांत हाताशी चांगले पैसे येतात, असे बाळाराम वाघे यांनी सांगितले.
वाडीतील संतोष वाघे गेल्या तीस वर्षांपासून फुलांच्या हारांसाठी लागणारी पळसाची पाने, हारात खोवण्यासाठी लागणारी लिंबाडय़ाची पाने कल्याण फूल बाजारात विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. दुपारनंतर परिसरातील जंगलात जाऊन पळसाची पाने, लिंबाडय़ाची पाने आणायची. रात्रीतून ती बंदिस्त करून सकाळीच कल्याणच्या फूल बाजारात विक्रीला न्यायाची. यामधून कुटुंब चालेल एवढे पैसे मिळतात, असे वाघे यांनी सांगितले.
वाडीच्या दोन्ही बाजूने लहान ओढे आहेत. या ओढय़ांच्या डोहामध्ये (लहान तलाव) एप्रिलपर्यंत पाणी असते. काही ग्रामस्थ ओढय़ाच्या भागात भेंडी, वांगी अशी भाजीपाल्याची लागवड करून दोन ते तीन महिने भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ओढय़ांच्यामध्ये गावरान मासळी मिळते. सकाळ, संध्याकाळ ओढय़ातून मासळी काढून ती विकण्याचा व्यवसाय वाडीतील स्त्रिया करतात. वाडीत बांबूची बेटं आहेत. बांधकामांसाठी लागणारा बांबू विक्रीचा व्यवसाय ग्रामस्थ करतात. वाडीच्या परिसरात वीटभट्टय़ा, बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. अनेक ग्रामस्थ या बांधकामांवर, वीटभट्टीवर मजुरीसाठी जातात. काही स्त्रिया आजूबाजूच्या गावांमध्ये लग्नाच्या ठिकाणी भोजन वाढण्यासाठी जातात. त्यातून घरखर्च निघतो. पावसाळ्यात आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी भात लावण्यासाठी घेतल्या जातात. पिकणारे धान्य अर्धे करून वाटणी केली जाते. त्यामुळे वर्षभराच्या तांदळाची घरात बेगमी होते. कातकरी वाडीतील ग्रामस्थांच्या स्वत:च्या मालकीच्या
जमिनी नाहीत. पण वरकस, माळरान जमिनीवर खड्डे करून नाडय़ांच्यामध्ये काही जण भाताची लावणी करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विस्थापनाची टांगती तलवार
आपण जेथे सुखाने राहतो तेथे मंदिराचे अधिष्ठान नसल्याने ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर बांधले आहे. दरवर्षी मंदिराचा दोन दिवस उत्सव साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सण, उत्सव नियमित वाडीत साजरे केले जातात. आम्ही वाडीत सुखाने राहतो. पण आमच्या अवतीभोवतीचे सार्वजनिक रस्ते सुस्थितीत करण्यासाठी राजकारणी, सरकारी विभागाने पुढाकार घ्यावा. वाडीला स्मशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात मृतदेहावर संस्कार करताना खूप अडचणी येतात. वाडीचा परिसर तळोजा येथे उभारण्यात येणाऱ्या सामाईक भराव भूमीच्या भौगोलिक क्षेत्रात येत असल्याने वाडीवर विस्थापित होण्याची टांगती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करायचे नाही, हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या सगळ्या जाचातून राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन वाडीची मुक्तता करावी आणि जांभूळ पिकल्या झाडाखाली आमचे जे सुखाने जीवन चालू आहे ते आमच्या पुढील पिढय़ांनाही उपभोगता यावे यासाठी येथील व्यवस्थेला धक्का लागणार नाही, यासाठी हालचाली कराव्यात, अशी वाडीतील ग्रामस्थांची मागणी आहे.