तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या रखडलेल्या कामांना जबाबदार धरत दोन उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी पालिकेतील शंभर अभियंत्यांनी मंगळवारी सामूहिक रजा टाकून आंदोलन सुरू केले आहे.
महापालिकेतील तांत्रिक कर्मचारी संघटनेने काल आयुक्तांना निवेदन देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशावरून निलंबित केलेले उपअभियंता प्रशांत भुजबळ, सुशील म्हादळेकर यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घ्यावे आणि एकतर्फी कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मंगळवारी सकाळी सर्व तांत्रिक अधिकारी, कर्मचारी कामावर आले. त्यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन सुरू केले. महापालिकेच्या अनेक भागांत विकासकामे सुरू आहेत. त्या कामांकडे अभियंते मंगळवारी फिरकणार नसल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पालिका आयुक्तांना अभियंत्यांवरील कारवाईचे आदेश दिले होते. यापूर्वी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. असे असताना कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस आणि उपअभियंत्यांचे निलंबन हा कुठला न्याय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंबंधी प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
मोठे मासे पकडा
साडेतीन वर्षांपासून प्रकल्प विभागाचे अभियंता म्हणून प्रमोद कुलकर्णी काम पाहत आहेत. सिमेंट रस्त्यांची कामे, त्यांच्या निविदा, त्यावरील देखरेख, सल्लागाराची नेमणूक अशा विषयाचे सर्वाधिकार कुलकर्णी यांना आहेत. त्यांचे या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सिमेंट रस्ते रखडण्याला सर्वस्वी प्रमोद कुलकर्णी जबाबदार आहेत, असा सूर महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे कारवाई करायची असेलच तर कुलकर्णी यांना अभय देऊन कसे चालेल, असा सूर महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे. मोठा मासा सोडून प्रशासन पालकमंत्र्यांच्या आदेशावरून छोटय़ा माशांना पकडत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा काही अभियंत्यांनी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिला.