कल्याण – कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी स्वच्छ सुंदर, प्रदूषण मुक्त राहील यादृष्टीने सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. मोहने, गाळेगाव भागातून उल्हास नदीत जाणारे मलनिस्सारणाचे नाले कायमस्वरुपी बंद करण्यासाठी एक विकास प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल येत्या आठवड्यात शासनाकडे अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन मोहने, गाळेगाव येथील उल्हास नदीत जाणारा मलनिस्सारण नाल्याचा विषय कायमचा बंद करण्यात येईल, असे कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारी माध्यमांना सांगितले.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांची पाहणी, पावसाळ्यातील पाणी तुंबणारे सखल भाग, उल्हास नदीतील जलपर्णी याविषयांची प्रत्यक्ष माहितीसाठी घेण्यासाठी आयुक्त गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त प्रसाद बोरकर, अतुल पाटील, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्या सोबत मोहने, उल्हास नदी भागाचा पाहणी दौरा केला.
उल्हास नदीमध्ये औद्योगिक कंपन्यांचे पाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. त्यामुळे नदी जलप्रदुषित होऊन जलपर्णी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. हा विषय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारितील आहे. तरीही मोहने, गाळेगाव येथील भागातून उल्हास नदीत जे मलनिस्सारणाचे पाणी थेट नदीत जाते. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पालिकेकडून एक विकास प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. शासनाच्या मंजुरीनंतर हे काम हाती घेऊन मोहने, गाळेगाव भागातील मलनिस्सारण आणि येथील नदी प्रदूषणाचा विषय निकाली काढला जाईल, असे आयुक्त गोयल यांंनी सांगितले.
उल्हास नदी स्वच्छ ठेवणे, या नदीचे पुनर्रूजीवन करणे यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील आणि नदी स्वच्छ सुंदर राहील यासाठी प्रशासन प्रयत्न करील. ‘चला जाणू या नदीला’ असा उपक्रम यापूर्वी शासनाने सुरू केला होता. असे काही उपक्रम हाती घेता येतील का. या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढविता येईल का याचाही विचार करण्यात येईल, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाच भर असेल. पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी आपण स्वता, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी शहराच्या वेगळ्या भागात विभागवार पावसाळ्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात असतील. आयुक्तांंनी मोहने लहुजीनगर, अनुपमनगर, चिकनघर भागातील नाल्यांची पाहणी केली. नाल्यांमध्ये कचरा वाहून जाणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपायक्त अतुल पाटील यांना दिल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, योगेश गोटेकर, अ प्रभाग साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर उपस्थित होते. जलपर्णीची पाहणी करताना आयुक्तांनी पर्यावरणप्रेमी नितीन निकम, श्रीनिवास घाणेकर, उमेश बोरगावकर यांच्याशी चर्चा केली.
पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबणार नाही याची प्रशासन काटेकोर काळजी घेत आहे. उल्हास नदी स्वच्छ सुंदर राहील यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न केले जातील. अभिनव गोयल आयुक्त.