कल्याण – नागरिकांच्या नागरी समस्या, बेकायदा बांधकामे, फेरीवाले समस्या आणि इतर तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांचा जनता दरबार ८ जुलै, मंगळवारी डोंबिवलीत होणार आहे. डोंंबिवली पूर्वेतील पालिकेच्या जुन्या धोकादायक विभागीय कार्यालयाजवळील पी. पी. चेंबर्स इमारतीमधील फ प्रभाग कार्यालय, पहिला माळा येथे दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वेळेत हा जनता दरबार होणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे आणि त्या तक्रारींचे पालिका अधिकाऱ्यांच्या समक्ष तात्काळ निराकरण करण्यासाठी जनता दरबार आयोजित केला जातो. अनेक वेळा नागरिक प्रभाग स्तरावर विविध नागरी समस्या, बेकायदा बांधकामे, फेरीवाले, रखडलेली विकास कामे, रस्ते कामे याविषयी तक्रारी करतात. पण प्रभाग स्तरावर विषय मार्गी लागत नाहीत.

नागरिक कल्याण येथे आयुक्तांकडे तक्रारी घेऊन जातात. तेथेही त्यांना अधिकाऱ्यांची भेट मिळतेच असे नाही. त्यामुळे आयुक्तांंच्या भेटीसाठी अनेक नागरिक प्रयत्नशील असतात. अशा नागरिकांच्या नागरी समस्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी कल्याण मधील पालिका मुख्यालयात आयुक्तांचा जनता दरबार असतो. दुपारी तीन ते पाच वेळ यासाठी असते.

या जनता दरबारासाठी डोंबिवलीतील नागरिकांना कल्याणला तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जावे लागते. बहुतांशी तक्रारदार नागरिक ज्येष्ठ नागरिक, वृध्द महिला, पुरूष असतात. मागील अनेक वर्षापासून निर्भय बनोचे संस्थापक महेश निंबाळकर प्रशासनाकडे पालिका आयुक्तांचा महिन्यातील एक तरी जनता दरबार डोंबिवली येथे घेण्यात यावा अशी मागणी करत होते. या मागणीला आता यश आले आहे.

जनता दरबारात सुमारे दीडशेहून अधिक नागरिक उपस्थित असतात. टोकन क्रमांक देऊन नागरिकांना थेट आयुक्तांकडे आपल्या तक्रारीचे गाऱ्हाणे मांडता येते. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, अभियंते, साहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे ती तक्रार तात्काळ सोडविण्याचे प्रयत्न केले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी दुपारी डोंबिवलीत आयुक्तांनी जनता दरबार आयोजित केल्याने तक्रारदार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी जनता दरबार आयोजित केले जात होते पण प्रत्यक्ष दरबाराच्या वेळी आयुक्त उपस्थित राहत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते. आयुक्त मंत्रालयात, मुंबईत बैठकीला गेले आहेत, अशी कारणे समपदस्थ अधिकारी देत होते.