एका बाजूला १४०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करत मोठय़ा विकास प्रकल्पाचा बडेजाव करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार मार्च महिना संपत आला तरी करण्यात आलेला नाही. महापालिकेच्या सेवेतील ठोक पगारी वाहनचालकांना डिसेंबरपासून पगार देण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दोन वर्षांपूर्वी १०५ वाहनचालक ठोक पगारावर भरती करण्यात आले आहेत. कचरा वाहतुकीच्या गाडय़ांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी भरती केलेले वाहनचालक पालिका पदाधिकारी, साहेबांच्या गाडय़ांवर राजरोस राबत आहेत. प्रामाणिकपणे काम केले तर आपण कायम होऊ, पगार वेळेत मिळेल असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे. असे असताना ठोक पगारावर काम करणाऱ्या या वाहनचालकांना डिसेंबर महिन्यापासून पगार मिळालेला नाही. या चालकांना महापालिका दरमहा दहा हजार रुपये पगार देते. पगार नाही म्हणून आवाज उठवला तर नोकरी जाईल अशी भीती या वाहनचालकांना असल्याने कोणीही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. परिवहन विभागाचा महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार होतो. फेब्रुवारी महिन्याचा पगार परिवहन कर्मचाऱ्यांना मार्च महिना संपत आला तरी मिळालेला नाही. परिवहन उपक्रम पूर्णपणे तोटय़ात आहे. पालिकेकडून अनुदान वेळेवर न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.  
पालिकेकडून अनुदान मिळाल्यानंतर परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार होईल. वाहनचालकांच्या कराराला मुदतवाढ देण्यात आल्याने त्यांचे पगार काढले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.