महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रांतील महिलांना संघटित करून त्यांच्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी दरवर्षी प्रशासनातर्फे महिला आणि बालकल्याण विभागासाठी अर्थसंकल्पात लाखो रुपयांची तरतूद करण्यात येते. महिलांसाठी एखादा विधायक उपक्रम राबवून त्यासाठी हा पैसा खर्च व्हावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. असे असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने चक्क हळदी-कुंकू समारंभावर दोन लाखांचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिकेतर्फे अशा प्रकारे हळदी-कुंकू समारंभासारखे कार्यक्रम आयोजित करता येतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. वर्षांची शिल्लक तरतूद मार्गी लावण्यासाठी हा प्रताप केल्याची चर्चा रंगली आहे.
काही वर्षांपूर्वी महिला- बालकल्याण विभागात शिलाई मशीनवाटप घोटाळा उघडकीला आला होता. गेल्या आठवडय़ात डोंबिवलीत महिला-बालकल्याण विभागाच्या एका कार्यक्रमाला महापालिकेच्या महिला कर्मचारी, माजी नगरसेविका, प्रभागातील महिला, मनसेच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हळदी-कुंकूचे वाण म्हणून महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले होते. हा कार्यक्रम एका खासगी कार्यक्रम करणाऱ्या संस्थेला नियोजनासाठी देण्यात आला होता. असे असताना सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च कोणी आणि कशासाठी केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिला बालकल्याण विभागाने समाज प्रबोधनाचा भाग म्हणून काही कार्यक्रम घ्यावेत, असा शासन आदेश आहे. त्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून हळदी-कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला. हा निधी खर्च केला नाही, तर तो परत जातो. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
– कोमल पाटील,
मनसेच्या महिला विभागाच्या सभापती