कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेचे देखभाल दुरूस्तीचे काम देण्यासाठी करण्यात आलेली ‘सर्वसमावेशक निविदा प्रक्रिया’ ठेकेदाराच्या कागदपत्रांची शहानिशा न करता करण्यात आल्याने रद्द करावी असा अहवाल कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांनी नगरविकास विभागाला दिला आहे. नवी मुंबईतील ‘अ‍ॅकॉर्ड मार्केटिंग वॉटरटेक अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला हे काम देण्यात आले होते.

या अहवालामुळे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेत आम्ही निरंकुशपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो या अविर्भावात असलेल्या नगरसेवकांना चांगलाच हादरा बसला आहे.
या निविदा प्रक्रियांच्यावेळी स्थायी समिती सभापतीपदी प्रकाश पेणकर, तर आयुक्त म्हणून रामनाथ सोनवणे होते. कौस्तुभ गोखले यांनी नगरविकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. नगरविकास विभागाने या निविदा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना दिले होते.

भुयारी गटार योजनेचा चौकशी अहवाल अद्याप आपल्यापर्यंत आला नाही. कोकण विभागीय आयुक्तांनी ही निविदा प्रक्रिया रद्द केली असेल तर आपल्या तक्रारीत तथ्य आहे. प्रत्यक्ष अहवाल हातात पडल्यावर आपण या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून या प्रकरणातील सर्व दोषी अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. ‘एसीबी’ने कारवाई करण्यास चालढकल केली तर हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात येईल.
– कौस्तुभ गोखले, तक्रारदार

भगवान मंडलिक, कल्याण