कल्याण – डोंबिवली जवळील पलावा खोणी गाव ग्रुप ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सरपंच ज्योती विश्वास जाधव यांची शुक्रवारी सरपंच पदी नियुक्ती झाली. यावेळी ठाकरे गटाचे डोंबिवली विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या समन्वयाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नवनिर्वाचित सरपंच जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि नव्या जोमाने पक्ष विस्तार करण्यासाठी शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. उध्दव ठाकरे यांनी थेट सरपंचांशी संवाद साधल्याने ठाकरे गट शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मोबाईलवरून पक्षप्रमुुख उध्दव ठाकरे यांनी नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांच्याशी जाहीरपणे संवाद साधला. ‘आपली निवड ही एका चांगल्या कामाची सुरूवात आहे. आता नव्याने जोमाने कामाला लागा. सर्व शिवसैनिकांनी केलेल्या प्रयत्नामुळे ही निवड झाली. त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा सांगा,’ असे उध्दव ठाकरे यांनी सरपंच जाधव यांना सांगितले. तसेच, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याशी संवाद साधून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपण केलेल्या प्रयत्नामुळे ठाकरे गटाचा सरपंच खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बसल्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

या निवडीच्यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा संघटक तात्या माने आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, तात्या माने यांनी नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

खोणी गाव शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यापूर्वीच्या या ग्रामपंचायतीमधील निवडणुका शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती झाल्या आहेत. खोणी गावच्या सरपंचपदी शिंदे शिवसेनेचा सरपंच बसेल अशी व्यवस्था वेळोवेळी शिंदे शिवसेनेकडून करण्यात आली. गेल्या महिनाभरापूर्वी शिंदे शिवसेनेचे गाव म्हणून शासनाचा एक भव्य उपक्रम खोणी गावात झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

शिंदे शिवसेनेच्या गावात ठाकरे गटाचा सरपंच बसल्याची वार्ता सर्वदूर पसरताच, राजकीय वारे फिरले. नेहमीप्रमाणे दडपशशाही आणि रेटून राजकीय वातावरण बदलण्याची ताकद असलेले राजकीय नेते रिंगणात उतरले. आणि मग ठाकरे गटाचे पदाधिकारी खोणी गावातून बाहेर पडल्यावर नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांनी आपणास सरपंचपदी विराजमान करण्यासाठी शिंदे शिवसेनेचे तालुकप्रमुख महेश पाटील यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनीच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. यापुढे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, अशा प्रकारची प्रतिक्रिया समाज माध्यमांत प्रसारित करून ठाकरे गटाला शह दिला आहे. शिंदे शिवसेना आणि ठाकरे गटातील कुरबुरी खोणी गावातील सरपंच निवडीवरून उघड झाली आहे.