कल्याण : टिटवाळ्या जवळील निंबवली गाव हद्दीत एका शाळकरी विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिला फूस लावून पळून नेण्याचा प्रयत्न एक रिक्षा चालक आणि त्याच्या दुचाकी वरील साथीदाराने केला. परंतु, विद्यार्थिनीच्या जागरुकतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन भामट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, शकुंतला वाघे आणि त्यांचे कुटुंब खडवली जवळील राये गाव हद्दीत राहते. मोलमजुरी करुन ते कुटुंबाची उपजीविका करतात. शकंतुला यांची पूजा ही मुलगी राये गावा जवळील निंबवली-गुरवली गाव हद्दीतील माध्यमिक विद्यालयात नववीत शिकते. सकाळी सात वाजताची शाळा असल्याने पूजाचे वडील तिला शाळेत सोडतात.

दुपारी एक वाजता शाळेतून पायी घरी घेऊन येतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे पूजाला तिचे वडील सुकऱ्या वाघे यांनी शाळेत सोडले. ते पुन्हा दुपारी तिला शाळेतून आणण्यासाठी जाणार होते. शाळेत शनिवारी आरोग्य शिबीर असल्याने त्या बैठकीसाठी शाळा सकाळी साडे अकरा वाजता सोडण्यात आली. एका वाजेपर्यंत शाळेत बसून वडिलांची वाट पाहत बसण्यापेक्षा पूजा आपल्या ओझर्ली येथील मैत्रिणींसोबत पायी राया गावाकडे निघाली. ओझर्लीतील मुली एका वाटने निघून गेल्यानंतर पूजा एकटीच राया गावाकडे पायी चालली होती. रस्त्याला एकटीच असल्याने तिला भिती वाटत होती. त्यावेळी समोरुन एक रिक्षा चालक आला. त्याने पूजाला राया गावाकडे जाणार रस्ता कोणा अशी विचारणा केली. पूजाने त्याला हाच रस्ता पुढे जातो असे सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी स्वार रिक्षा चालका जवळ आला. त्याने खिशातून एक बाटली रिक्षा चालकाच्या हातात दिली. चालकाने ती रुमालाने उघडण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग

रिक्षा चालक, दुचाकी स्वार आपले अपहरण करतील या भीतीने पूजाने या दोघां जवळून पळ काढला. तिने निंबवली गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश हिरवे यांच्या घराचा आधार घेतला. पूजाने रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार आपला पाठलाग करत असल्याचे गणेश यांना सांगितले. पळून दम लागल्याने पूजा जमिनीवर कोसळली. गणेश यांनी तात्काळ रस्त्यावर जाऊन दोघांचा शोध सुरू केला. तोपर्यंत दोघे टिटवाळा दिशेेने पळून गेले होते.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार गणेश हिरवे यांनी राम केणे यांना सांगितला. या दोघांनी पूजाला सुखरुप राया येथे आणून सोडले. त्यानंतर केणे यांच्या सोबतीने पूजाची आई शकुंतला यांनी मुलीच्या बाबतीत घडल्या प्रकाराची टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. दोन्ही भामटे ३० वयोगटातील होते.