अंबरनाथः ‘राज साहेबांनी यांना कपडे घालायला शिकवले, मोठ्या गाड्यांमधून फिरायला शिकवले पण जेव्हा राजसाहेबांना गरज होती त्यावेळी हे पळून गेले. दुसऱ्या पक्षात जाण्याचे कारण काय, पैसा का’ असा संतप्त सवाल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. अंबरनाथ शहरातील मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदाच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. येत्या पालिका निवडणुकीत या सर्वांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जाधव यांनी बोलताना दिला.
अंबरनाथ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात नुकतीच मोठी फुट पाहायला मिळाली. मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह संदिप लकडे, स्वप्निल बागूल, अपर्णा भोईर या माजी नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला. या फुटीनंतर मनसेला मोठे खिंडार पडल्याचे दिसून आले. या फुटीनंतर शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध संताप व्यक्त केला.
पक्षातून फुटून गेलेले माजी नगरसेवक आणि शहर अध्यक्ष कुणाल भोईर हे राजू पाटील, अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे पक्षाची धुराही सोपवण्यात आली होती. त्यांचा राज ठाकरेंशी संवाद होता, त्यामुळे त्यांना आणखी काय हवे होते, असे सवाल करत राजसाहेबांची खुर्ची हवी होती का असा संतापही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. तर दुसऱ्या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बंडखोर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर नोटांचे बंडल भिरकवत आंदोलन केले होते. पालिका निवडणुकीत या पदाधिकाऱ्यांना धडा शिकवू असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला होता. मात्र या बंडखोरीवर वरिष्ठ मनसे नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती.
अखेर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या पक्षात गेलेल्यांवर अन्याय होत होता का, कुणाल भोईर यांच्यालर पक्षाची धुरा होती. मात्र त्यांनीच पक्षाचे वाटोळे केले. दुसऱ्या पक्षात जाण्याचे कारण काय, पैसे का, असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. हे लोक राजू पाटील यांना भाऊ, दैवत म्हणत होते ना, मग त्यांनाच त्रास देणाऱ्या लोकांच्या हाताला राखी बांधताना तुम्हाला काही वाटले नाही का, तेव्हा तुमची निष्ठा कुठे गेली होती, असा संताप जाधव यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे साहेबांनी या सर्वांना कपडे घालायला शिकवले, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायला शिकवले पण राजसाहेबांना गरज होती तेव्हा हे पळून गेले, अशी टीका जाधव यांनी यावेळी केली. जो मतदान करतो त्यांना माहिती आहे की हे गद्दार आहेत. त्यांच्यावर आयुष्यभर गद्दारीचा शिक्का राहील. येत्या पालिका निवडणुकीत मनसे यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असाही इशारा यावेळी अविनाश जाधव यांनी दिला. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी मनसेच्या जिव्हारी लागली असून येत्या निवडणुकीत मनसेच्या भूमिकेचा या शिवसेनेत गेलेल्यांना काय फटका बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.