सट्टेबाजी, फिक्सिंग, घसरती कामगिरी, राजकारण या सर्वामुळे क्रिकेटची लोकप्रियता घसरत असताना जगभर प्रसिद्ध पावलेला फुटबॉल हा खेळ भारतातही चांगलाच रुजला आहे. मात्र, ठाणे शहरातील फुटबॉलपटूंच्या पदरी अजूनही निराशाच पडत आहे. ठाणे फुटबॉलसाठीचे खास मैदानच नसल्याने खेळाडूंना चक्क छोटी मैदाने भाडय़ाने घेऊन खेळाचा सराव करावा लागत आहे.
ठाण्यात नुकत्याच झालेल्या फुटबॉल लीगमध्ये एकटय़ा ठाणे शहरातूनच १०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शहरात खेळाडू आहेत, पण मैदान मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातील जे.के. सिंघानिया, श्रीमा आदी मोठय़ा शाळांमध्ये तर, पोलीस ग्राऊंड, रेमंड कंपनी, टेक्सन कंपनी आदींची मोठी मैदाने आहेत. परंतु, ही मैदाने त्यांच्या खासगी वापराची असल्याने बाहेरील संस्थांना वापरता येत नाहीत. तसेच, महापालिकेचे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदान क्रिकेट खेळासाठी मिळत असले तरी, ते फुटबॉलसाठी मात्र मिळत नाही. शहरात फुटबॉलचे जवळपास पाच क्लब असून त्यातील सॅल्से फुटबॉल क्लब यांनी ठाणे फुटबॉल लीगचे उपवन तलावाजवळील छोटे मैदान भाडय़ाने घेत सामने भरवले होते. परंतु,  या क्लबला मोठे मैदान मिळत नाही. तसेच या सॅल्से फुटबॉल क्लबने मुंबई फुटबॉल लीगसाठी सध्या नोंदणी केली आहे. मात्र त्यांना मैदानी सरावासाठी खूप अडचणी येत आहेत. सध्या होऊ घातलेल्या इंडियन सुपर लीग या फुटबॉलच्या मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या स्पर्धेत पुण्या-मुंबईच्या खेळाडूंनी कोटय़वधी रुपये कमावले आहेत. परंतु, ठाण्याचा संघ व खेळाडू मात्र यापासून दूर आहेत. त्यामुळे शहरात उपलब्ध असलेल्या मोठय़ा मैदानांवर फुटबॉल खेळ खेळता यावा या आशेत सध्या ठाणेकर फुटबॉल खेळाडू आहेत.

ठाणे शहरात फुटबॉल खेळासाठी लागणारे गुणी खेळाडू आहेत. मात्र त्यांना वर आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे. यातील मोठी समस्या अशी की फुटबॉल खेळासाठी अपेक्षित असलेले मोठे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याने छोटय़ा मैदानांवरच खेळणे भाग पडत आहे. मोठय़ा मैदानांसाठी भाडे भरण्याची तयारी असूनदेखील मैदान मिळत नाही, ही खंत असून यासाठी आता महापालिका व क्रीडा विभागाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे.
-सूरज पिल्लई, फुटबॉल प्रशिक्षक, संचालक, सॅल्से फुटबॉल क्लब