ठाणे : देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोकड विरहीत व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आव्हान करत असतानाच दुसरीकडे सरकारी यंत्रणाच रोकड व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील अत्यंत गजबजलेल्या खोपट एसटी थांबा आणि वंदना आगारात प्रवाशांकडून रोकडाच व्यवहार केला जात आहे. ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसल्याने तिकटी काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रवाशांकडे रोकड नसल्यास परिसरातील एटीएम केंद्राची वाट धरावी लागत आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’ सारख्या मोहिमा राबवल्या आहेत. त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बँकिंग, किरकोळ खरेदी, वाहतूक व्यवस्था, अगदी भाजी विक्रेते आता युपीआय आणि क्युआर कोडच्या माध्यमातून व्यवहार करताना दिसतात. या मोहीमेच्या माध्यमातून सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असले तरी प्रत्यक्षात काही शासकीय सेवांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धती वापरली जात आहे. रोख व्यवहारांवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानक, वंदना, खोपट व परिसरातील इतर महामंडळ आगारा मधील खिडकीजवळून प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी केवळ रोखीनेच पैसे द्यावे लागत आहेत.

बहुतांश नागरिक युपीआय, मोबाईल आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करतात. त्यामुळे रोख रक्कम न बाळगता प्रवास करणाऱ्यांना तिकीट खरेदी करताना अडचणी येत आहेत. काही प्रवाशांनी ऑनलाइन व्यवहाराची सुविधा नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आगारामधील खिडकीजवळ विचारणा केली असता क्युआर कोडची सुविधा वरून उपलब्ध झाली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे व्यवहार सुलभ आणि प्रवाशांच्या सोयीचे व्हावेत यासाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, मोबाईल अॅपद्वारे नोंदणी तसेच बसमध्ये वाहकाकडून क्युआर कोडद्वारे तिकीट देण्याच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत. परंतु, आगारामध्ये पुर्व नोंदणी करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रीया

ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसणे ही खूप मोठी अडचण आहे. आगारामध्ये तिकीटाची नोंदणी करण्याकरिता रोख पैसे बाळगावे लागतात आणि अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे अडचणी येतात. त्याचप्रमाणे रोकड व्यवहार असल्याने पैशांची देवाण – घेवाण करण्यात वेळ जातो. यामुळे तिकीट नोंदणीसाठी आलेल्या प्रवाशांच्या अधिक रांगा लागतात. कोमल कणसे, प्रवासी