Thane Lake City : लहानमुले सुद्धा साहसाच्या अनुभवाला मुकत नाहीत याचे उत्तम उदाहरण ठाणे शहरात पाहायला मिळाले. अवघ्या पाच वर्षाच्या मितांशने त्याच्या आईसह मासुंदा तलावात लेक क्रॉसिंगचा थरारक अनुभव घेतला. इतक्या लहान वयात हे साहस करताना त्याच्या चेहऱ्यावर भितीचा लवलेशही नव्हता. शिवाय, ‘आई मला पुन्हा एकदा करायचे आहे’ असा हट्ट तो आईकडे करताना दिसून आला.
ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाण्यातील मासुंदा, उपवन, कचराळी, मखमली असे काही महत्वाचे तलाव असून या तलावाकाठी विविध उपक्रम पार पडत असतात. ठाणे शहराच्या मध्यभागी असलेला मासुंदा तलाव तर, शहराचे केंद्र बिंदू आहे. स्थानक परिसरापासून हा तलाव हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या तलावाभोवती दिवसभर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. या तलावाच्या येथे असलेल्या घाटावर सायंकाळी गाण्यांच्या मैफल रंगताना दिसतात. याला ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. यांसारखे विविध कार्यक्रम या तलावाभोवती होत असतात.
यंदाचा शनिवार मासुंदा तलावाजवळ आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षित आणि अविस्मरणीय ठरला आहे. त्याला कारण देखील तितकेच महत्वाचे आहे. श्री आनंद भारती समाज आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मासुंदा लेक क्रॉसिंग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे २० वर्षानंतर पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी या उपक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी पहिल्या तासाभरातच सुमारे पन्नासहुन अधिक ठाणेकरांनी सहभाग नोंदवला होता.
सहभागी झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे नागरिकही बिनधास्तपणे लेक क्रॉसिंगची मज्ज लुटत होते. परंतू, या सर्व सहभागांमध्ये पाच वर्षाच्या मितांशने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. आपल्या आईसह त्याने या उपक्रमात सहभाग घेतला होता. इतका साहसी आणि धाडसी उपक्रम येवढा लहान मुलगा कसा पार करेल असा प्रश्न तेथील सर्व उपस्थितांच्या मनात आला होता. परंतू, लेक क्रॉसिंग करताना दोरीला घट्ट पकडून त्याने आपल्या आईसह पाण्यावरून सहज प्रवास केला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भितीचा लवलेशही दिसत नव्हता. मितांशच्या या धाडसाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. साहसाचा हा अनुभव मितांशसाठी अविस्मरणीय ठरला असून त्याने अगदी लहान वयात धाडसाचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर घालून दिले आहे. लेक क्रॉसिंग हा उपक्रम इच्छुक ठाणेकरांना रविवारी अनुभवता येणार आहे, असे या साहसी उपक्रमाचे संयोजक देवेशू ठाणेकर यांनी सांगितले.