लावणी, विनोदी कार्यक्रमांची रेलचेल
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची दिलखेच अदाकारीतल्या लावण्या, तसेच मराठीतील सेलिब्रिटी, आपल्या विनोदाने खळखळून हसवणारे विनोदवीर आणि मराठी हिंदीतील उभरत्या गायक कलावंतांचे सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी बदलापूरकरांना बदलापूर महोत्सवाच्या रूपाने मिळणार आहे.
शिवसेना शहर शाखा व शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही बदलापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवार २४ फेब्रुवारी ते रविवार २८ फेब्रुवारीपर्यंत उल्हास नदीकाठच्या चौपाटीवर हा महोत्सव सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत रंगणार आहे.
बुधवार २४ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सुरुवात बदलापूर टॅलेंट नाइटने होणार असून २५ फेब्रुवारी रोजी सुरेखा पुणेकर यांच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी मराठी तारकांचा लावणी उत्सव होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी ‘कॉमेडी शॉमेडी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रविवार २८ फेब्रुवारी रोजी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित गायक कलाकारांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
‘म्यूझिकल फाउंटन शो’
दररोज मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी उल्हास नदीच्या पात्रात म्यूझिकल फाउंटन शोचे आयोजन करण्यात आले आहे. विदेशात प्रसिद्ध असलेला अशा प्रकारचा शो हा बदलापूरकरांसाठी एक पर्वणीच ठरणार असल्याने, नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर महोत्सवाला हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.