उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील रस्त्यांची स्थिती दयनीय असून विविध कामांच्या खोदकामामुळे कायमच वाहतूक कोंडीची स्थिती असते. त्यातच जलवाहिन्यांची गळती, परिणामी पडणारे खड्डे आणि कचरा यामुळे अस्वच्छता वाढल्याचे दिसून आले आहे. याच परिस्थिती उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीनंतर खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले.

गळती काढणे, कचरा आणि अतिक्रमण हटवण्याचेही आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. त्यामुळे आता खड्डे लवकर बुजतील अशी आशा आहे.शहरातील कोंडी, अस्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरातील विविध स्थळांची पाहणी केली.

उल्हासनगर कॅम्प १ मधील धोबी घाट रस्ता, कल्याण मुरबाड रस्ता, उल्हासनगर कॅम्प २ मधील खेमाणी भाजी मार्केट चौक, एस.ई.एस शाळा, खेमाणी चौक, नानिक जिरा चौक, मध्यवर्ती पोलीस ठाणे रस्ता, उल्हासनगर कॅम्प तीन भागातील मयुर हॉटेल रस्ता, कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फॉलवर लाईन चौक, उल्हासनगर कॅम्प चार भागातील लालचक्की ते उल्हासनगर रेल्वे स्थानक रस्ता, शिवनेरी रूग्णालय रस्ता, उल्हासनगर कॅम्प पाच भागातील भाटीया चौक ते गाऊन बाजार रस्ता, नविन टाऊन सभागृह, नेताजी चौक ते हिल लाईन पोलीस ठाणे रस्ता, भाजी मंडई, तहसीलदार कार्यालय ते मासळी बाजार रस्ता या भागात पाहणी केली.

उल्हासनगर शहरातील जवळपास सर्वच वर्दळीचे रस्ते, चौक, बाजारपेठा आणि महत्वाच्या आस्थापनाच्या परिसरातील सद्यस्थितीची यावेळी पाहणी करण्यात आली. यातील बहुतांश रस्ते, चौकांमध्ये आयुक्त मनिषा आव्हाळे यांना खड्डे निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच अनेक भागात रस्त्यावर गळक्या जलवाहिन्यांमुळे पाणी पसरल्याचेही निदर्शनास आले. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण दिसून आले.

रस्त्यावरील अतिक्रमण, रस्त्यात पडलेले खड्डे आणि गळक्या जलवाहिन्यांमधून येणारे पाणी यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यांवर अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावे, असे आदेश यावेळी आयुक्त मनिषा आव्हाळे दिले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेली रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही आदेश यावेळी देत संबंधित कंत्राटदारांना नोटीसा बजावण्याचेही आदेश देण्यात आले.

कचराही काढास्वच्छतेसाठी कोट्यावधींचा खर्च होत असताना बेशिस्त नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी नुकत्याच केलेल्या पाहणी रस्त्यावर इतरत्र पसरलेला कचरा दिसून आला. हा सर्व कचरा हटवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. तर स्त्यावरील जलवाहिन्याची गळतीही लवकरात लवकर काढून पाणी पुरवठा यंत्रणा दुरूस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.