अंबरनाथः शहराच्या वेशीवर असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या जलवाहिन्यांवर बिबट्या बसला असल्याचे छायाचित्र प्रसारीत झाल्याने एकच खळबळ उडाली. हा समृद्ध जंगल परिसर बिबट्याचा अधिवास असून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या वेशीवर दोन्ही बाजूंना असलेल्या घनदाट जंगलात अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतेच काही छायाचित्र आणि चित्रफित प्रसारीत झाली असून त्यात बिबट्या एका जलवाहिनीवर बसल्याचे दिसून आले. या छायाचित्रांमध्ये हा परिसर अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या जांभूळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशु्द्धीकरण केंद्राच्या परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत बदलापूर वनक्षेत्रपाल विवेक नातू यांना संपर्क केला असता या भागात बिबट्या पाहिला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसारीत झालेले छायाचित्र खरे असून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे नातू यांनी सांगितले आहे. हा भाग संपन्न असल्याने येथे अनेक प्रकारचे भक्ष्य बिबट्यासाठी उपलब्ध आहेत. शिकार मिळत असल्याने बिबट्याचा या भागात वावरत असतो. तीन महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे बिबट्या असल्याचे दिसून आले होते. हा बिबट्याचा अधिवास असून सध्या तरी बिबट्याने कुणालाही त्रास दिल्याची नोंद नाही, असेही नातू यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा… ठाणे स्थानकात फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवशी ८.६६ लाखांची दंड वसुली!

हेही वाचा… डोंबिवली लोकलसाठी रांगेतून प्रवास; हुल्लड टाळण्यासाठी सकाळीच रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्यांचा अधिवास

कल्याण आणि बदलापूर वनपरिक्षेत्र हे गेल्या काही वर्षात समृद्ध बनले आहे. येथे उल्हास आणि बारवी नदीच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता तसेच भक्ष्य असल्याने बिबट्या या भागात वास्तव्य करत असतो. अनेकदा शहरांच्या वेशीवर बिबट्याचा अधिवास दिसून येतो. काही महिन्यांपूर्वी जून्नर वनक्षेत्रातील रेडिओ कॉलर असलेला बिबट्या शहराच्या वेशीवर फिरत असल्याचे दिसून आले होते. मात्र काही दिवसांनी तो परतला. त्यामुळे हे क्षेत्र बिबट्याचे अधिवास असल्याचे स्पष्ट आहे.