नोकरदारांचे हाल; पाणीपुरवठा बंद; मोबाइल, इंटरनेट सेवाही विस्कळीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये सोमवारी सकाळी अचानकपणे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर अनेक मोबाइलचे नेटवर्क आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली. त्याचा फटका सध्या घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गासह ऑनलाइनद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल झाले. त्यामुळे अनेक जण रेल्वे रुळावरून कामावर तर काही जण घरी निघाल्याने रुळांवर प्रवाशांचे जथ्थे दिसून येत होते. याशिवाय वीज नसल्यामुळे पाण्याचे पंप बंद झाल्याने त्याचा परिणाम शहरांमधील पाणीपुरवठय़ावर झाल्याने नागरिक मेटाकुटीला आले होते. दुपारी उशिरापर्यंत शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

सोमवारी सकाळी वीजवितरण व्यवस्थेत काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला. ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच आसपासच्या शहरात वीज नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आठवडय़ातील कामाचा पहिला दिवस असलेल्या सोमवारीच बत्तीगुल झाल्याने नोकरदार वर्गाचेही हाल झाले. वीज नसल्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरून होणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. सध्या लोकलगाडय़ांमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करीत असून लोकल ठप्प झाल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. अखेर काहींनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे रुळावरून चालत जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे रेल्वे रुळांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे जथ्थे पाहायला मिळाले. तर, रेल्वे बंद झाल्यामुळे काहींनी घरची वाट धरली. तर काहींनी परिसरातील बस थांबे गाठले. त्यामुळे शहरातील बसथांब्यांवर गर्दी झाली होती. लोकलमध्ये महिला बराच काळ थांबून होत्या. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लोकलच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती देत प्रवाशांना उतरण्यास मदत केली. रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी कार्यालये वेळेत गाठता आली नाहीत.

ठाण्यातील पाणीपुरवठा बंद

वीजपुरवठा खंडित झाल्याने टेमघर येथील ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचे आणि स्टेम प्राधिकरणाचे पंपिंग बंद झाले होते. यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी तसेच इतर शहरांनाही पाणीपुरवठा करण्यात येतो. या शहरांच्या पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे. पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडल्यामुळे आता ते रुळावर येईपर्यंत नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

कल्याणमध्येही फटका

टाटा वीजपुरवठा कंपनीच्या वीज वितरणात तांत्रिक बिघाड झाल्याने या कंपनीकडून कल्याण शहराला होणारा वीजपुरवठा सोमवारी सकाळी खंडित झाला. त्याचा फटका शहरातील सुमारे ६० हजार वीज ग्राहकांना बसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी गांधारे, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कल्याण पूर्वेला केबी १ फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. हा फिडर बंद पडल्याने ९० फुटी रस्ता, टाटा कंपनी, नेतिवली, तिसगाव भागातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरवरून वीज देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. हे फिडर वगळता शहरातील इतरत्रचे सर्व फिडर योग्यरीतीने काम करीत आहेत, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे डोंबिवली शहराच्या वीजपुरवठय़ावर कोणताही परिणाम झाला नाही.

एटीएम केंद्रे, सिग्नल बंद

ठाणे शहरात वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे एटीएम केंद्र बंद पडल्याने नागरिकांना पैसे काढणे शक्य होत नव्हते. तर सिग्नल यंत्रणाही बंद पडल्याने वाहतूक पोलिसांना शहरातील चौकांमधील वाहतूक मानवी पद्धतीने हाताळावी लागत होती. टाळेबंदीमुळे शहरातील कंपन्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक नोकरदार घरातूनच कार्यालयातील कामे करत आहेत. मात्र, वीज नसल्यामुळे इंटरनेट सुविधा ठप्प होण्याबरोबरच मोबाइलचे नेटवर्क मिळत नसल्याने त्यांचे हाल झाले. तसेच लॅपटॉपही चार्जिग करणे शक्य होत नव्हते. तर महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षाही सोमवारी दुपारी होत्या. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. अखेर दुपारी १ वाजेच्या सुमारास काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life in thane district came to a standstill after power outage zws
First published on: 13-10-2020 at 00:37 IST