मध्य रेल्वे व्यवस्थापन दर दोन-पाच मिनिटांनी ‘प्रवाशांचा प्रवास सुखाचा होवो’ अशी सदिच्छा व्यक्त करणारी उद्घोषणा करीत असते. सुरक्षित प्रवासाची वेळोवेळी हमीसुद्धा दिली जाते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे स्थानक परिसरातील अडचणी आणि अस्वच्छतांचा सामना करीत गाडी पकडणे आणि गाडीतून उतरल्यावर पुन्हा स्थानक परिसरातून बाहेर येणे हे एक प्रकारचे दिव्यच आहे. त्याची अनेक कारणे सांगता येतील. एक तर फलाटांवरील अर्धवट छतांमुळे प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागते. स्थानक परिसरात सदैव भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा संचार असतो. फलाट तसेच त्याबाजूच्या मोक्याच्या जागा फेरीवाल्यांनी बळकावलेल्या असतात. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय वाईट असते. फलाटांवर नेऊन सोडणाऱ्या पुलांवर सदैव गर्दी असल्याने अनेक प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोका पत्करतात. मध्य रेल्वेवरील सध्या सर्वाधिकप्रवासी संख्या असणाऱ्या ठाणे स्थानकाची ही अवस्था तर इतरांची काय अवस्था असेल, याची कल्पनाच केलेली बरी..