ठाणे : साहित्यातून सिनेमासारखी कलाकृती होताना शासकांची धारणा किंवा बघण्याची वृत्ती यात सध्याच्या काळात खूप मोठा बदल झाला आहे. पण आपल्या कलाकृतीला विरोध होईल, या भीतीने सुचणं बंद होता कामा नये, असा सूर ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधील ‘माध्यमांतर-पुस्तकातून पडद्यापर्यंत’ या संवादसत्रात शनिवारी व्यक्त झाला.

साहित्यकृतीचे सिनेमा, नाटक किंवा मालिका ते ओटीटीपर्यंत माध्यमांतर करताना येणारे अनुभव आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये आयोजित केलेल्या या संवादसत्रात लेखक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर आणि सुजय डहाके हे सहभागी झाले होते. गडकरी रंगायतनच्या ‘कट्ट्या’वर झालेल्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी या तिघांशी संवाद साधला.

राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील अनेकांच्या भावना आजकाल सहज दुखावल्या जातात, या मुद्द्यावर बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, सध्या आपल्याला आवडलेले बोलणे, करणे याला मर्यादा आल्या आहेत. पण विरोध होऊ शकणाऱ्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडस वेगळे आहे. अशा अनेक कलाकृती आहेत, ज्यांना विरोध व्हायला हवा होता, पण त्या इतक्या चाणाक्ष पद्धतीने सादर झाल्या की विरोध करणाऱ्यांना कळलंच नाही की नेमका विरोध कशाला करायचा.

माध्यमांतर करताना मूळ साहित्यकृतीतील दृश्यात्मकता लक्षात यायला हवी. माध्यमांची बलस्थाने लक्षात घेतली नाहीत, तर सिनेमा किंवा नाटक फसू शकते, याकडे लेखक अभिराम भडकमकर यांनी लक्ष वेधले. हे सांगताना त्यांनी पुलंच्या ‘रेल्वेने रूळ अगदी अलगद बदलावा, तसे माध्यमांतर व्हायला हवे. थोडा खडखडाट तर होणारच’, या वाक्याची आठवण भडकमकर यांनी करून दिली.

सिनेमा या माध्यमाचे काही नियम, वेळेचे बंधन असते. हे माध्यम कादंबरीसारखे वर्णनात्मक नाही, त्यामुळे सिनेमा करताना मूळ साहित्यातील दृश्यात्मकता शोधणे हे आव्हान असते, असे मत लेखक, दिग्दर्शक सुजय डहाके यांनी मांडले. मराठी सिनेमाला त्याचा नेमका प्रेक्षक माहीत नाही, त्यामुळे विषयांबाबत सारे गंडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

सर्व उत्तम कलाकृतींचा मूळ स्राोत साहित्यच आहे, याकडेही या तिन्ही लेखकांनी विविध साहित्यकृतींवर बेतलेल्या सिनेमा, नाटकांची उदाहरणे, स्वत:च्या कलाकृती निर्मितीचे अनुभव असे दाखले देत हा संवाद रंजक केला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांच्या हस्ते तिन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.