गावोगावी, शहरांमध्ये जशी ग्रंथालये स्थापन होतात, तशीच परिसरात नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतींतील लोकांची गरज ओळखून ग्रंथालये स्थापन होत असतात. ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील ‘आय रिड इंडिया’ हे ग्रंथालय परिसरातील रहिवाशांसाठी वाचनासाठीचे उत्तम माध्यम बनले आहे. ‘आय रिड इंडिया’ असे नाव वाचले की एखादे सार्वजनिक मोठे ग्रंथालय असेल आणि ग्रंथालयात अनेक कर्मचारी, ग्रंथपाल असतील, असा भास होतो. मात्र ठाण्यातील रेवती गोगटे या महिलेच्या वाचनाच्या आवडीतून ‘आय रिड इंडिया’ हे ग्रंथालय स्थापन झाले आहे. वाचनाची आवड आणि आपल्यासोबत इतरांनाही वाचनाची गोडी लावण्याची इच्छा यातून रेवती गोगटे यांनी २००१ मध्ये आपल्या घरी असलेल्या पुस्तकांच्या संग्रहातून घरपोच वाचनालयाचा प्रारंभ केला. अवघ्या दहा सभासदांपासून रेवती यांनी वाचनप्रेमींना पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला. पूर्वी ‘वाचू आनंदे’ या नावाने स्थापन झालेले ग्रंथालय सध्या हिरानंदानी परिसरात ‘आय रिड इंडिया’ या नावाने लोकप्रिय आहे.
सध्या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या दहा हजार असून परिसरातील वाचक मोठय़ा प्रमाणावर या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. हिरानंदानी परिसरातील नागरिक या ग्रंथालयात संध्याकाळी पुस्तकांसाठी गर्दी करतात. याशिवाय काही वाचकांना ग्रंथालयातून घरपोच पुस्तकसेवा पुरवण्यासाठी रेवती गोगटे प्रयत्नशील आहेत. वाचकांना घरपोच सेवा पुरवण्यासाठी ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग आहे. ठाण्यातील नौपाडा, वसंतविहार, वृंदावन सोसायटी, बाळकुम, श्रीनगर, घोडबंदर या परिसरात ग्रंथालयाचे कर्मचारी घरपोच पुस्तकांची सेवा पुरवतात. ग्रंथालयातील काही पुस्तके कर्मचारी वाचकांकडे घेऊन जातात आणि आपल्या आवडीनुसार पुस्तके घेतात किंवा अनेकदा वाचकांच्या मागणीनुसार पुस्तके पाठवली जातात. पुस्तकांचे परीक्षण वाचून किंवा वाचक मागणीनुसार रेवती गोगटे स्वत: पुस्तकांची खरेदी करत असतात. ३०० रुपये महिना आणि सहाशे रुपये अनामत रक्कम यातून ग्रंथालयात पुस्तकांची खरेदी केली जाते. २५० पेक्षा जास्त ग्रंथालयाची सभासद संख्या आहे. ग्रंथालयातून वाचकांना कायम चांगले पुस्तक देण्याचा प्रयत्न होत असतो. यासाठी ग्रंथालयातील प्रत्येक पुस्तक कव्हर घातलेले असते. रेवती गोगटे प्रत्येक नवीन आलेल्या पुस्तकाला स्वत: कव्हर लावतात.
मराठी पुस्तकांसाठी मागणी कमी ही खंत
ग्रंथालयात सुरुवातीला केवळ मराठी पुस्तके होती. ग्रंथालयात गोगटे यांच्या स्नेहींनी काही इंग्रजी पुस्तके त्यांना दिली. तेव्हापासून इंग्रजी पुस्तके वाचनालयात ठेवण्यात आली. वाचकांच्या मागणीनुसार ग्रंथालयात इंग्रजी पुस्तकांचा भरणा केला जातो. अलीकडे मराठी भाषिक लोकांचाही मराठी पुस्तकांऐवजी इंग्रजी पुस्तकांकडे जास्त कल आहे. त्यामुळे मराठी वाचक कमी आहेत, असे रेवती गोगटे यांनी सांगितले.
स्वतंत्र संकेतस्थळ
ग्रंथालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून ग्रंथालयातील सर्व पुस्तकांची माहिती या संकेतस्थळावर वाचकांना पाहता येते. आपल्याला हवे असलेले पुस्तक लेखकांच्या नावानुसार संकेतस्थळावर शोधता येते. लेखकाचे नाव संबंधित रकान्यात लिहिल्यास ग्रंथालयातील त्या लेखकाच्या पुस्तकांची यादी संकेतस्थळावर येते. केवळ पुस्तक यादी येत नसून त्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होते. प्रत्येक पुस्तकाला क्रमांक देण्यात आलेले आहेत. संकेतस्थळावर दर्शवलेल्या क्रमांकाचे पुस्तक शोधून वाचकांना त्वरित पुस्तक देण्यात येते. रेवती गोगटे यांचे पुस्तकप्रेम एवढे की कोणत्या क्रमांकाचे पुस्तक कुठे ठेवले आहे हे त्या बिनचूक सांगतात.
‘वाचक घर’ मैत्रिणींचा उपक्रम
ग्रंथालयाची स्थापना केल्यापासून सातत्याने ‘वाचक घर’ हा उपक्रम ग्रंथालयातर्फे होत असतो. रेवती गोगटे आणि त्यांच्या काही वाचक मैत्रिणी घरी जमतात. नवीन आलेल्या किंवा एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करतात. या पुस्तक चर्चेमुळे ग्रंथालयातील पुस्तक निवडीसाठी सोपे जाते. यातून वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होते. गेली १५ वर्षे वाचक घर हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. ग्रंथालयात विद्या बाळ, अच्युत गोडबोले, कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर यांसारख्या मान्यवरांनी भेट दिली आहे. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी काही उपक्रम राबविण्याचा ग्रंथालयाचा प्रयत्न आहे.
आय रिड इंडिया, १३१ पहिला मजला, आरर्केडिया शॉपिंग सेंटर, हिरानंदानी इस्टेट, जी. बी, रोड, ठाणे पश्चिम.
वेळ – सकाळी १० ते २ सायंकाळी ५ ते ८.३०.
– किन्नरी जाधव