पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्ब वापराच्या धमक्या देत आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि अनुच्छेद ३७०ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शनिवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात केले.

ठाणे येथील मानपाडा भागात शनिवारी भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य व ठाणे शहरातील उमेदवार संजय केळकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मौर्य यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गेल्या ७० वर्षांपासून देशाला कीड लागली होती, ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अनुच्छेद ३७० ही त्यापैकी एक कीड होती, असे मोर्य यांनी सांगितले.   पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. त्याला चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि कलम ३७०ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, असे वक्तव्य मौर्य यांनी केले. तसेच प्रत्येकाने आपल्या आप्तांनाही भाजपलाच मतदान करण्यास सांगायला हवे. मतदान इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे की मतदान यंत्र हे कमळाच्या चिन्हानेच भरून गेले पाहिजे, असे विधानही त्यांनी केले. भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान झाले तर काँग्रेस पुन्हा मतदान यंत्राला दोष देईल, असेही ते म्हणाले.

लक्ष्मी ही कमळातून येते, घडय़ाळ्यातून नाही. घडय़ाळ बंद पडले आहे. तुम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हद्दपार करायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.